रत्नागिरी मध्ये गेली १० वर्षे कोकण शिक्षणाचे कार्यालय भाड्याच्या जागेमध्ये स्थित आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये गेली कित्येक वर्षे कोकण बोर्ड अव्वल येत आहे. कोकण बोर्डाची कामगिरी इतकी वर्ष उत्कृष्ट असूनसुद्धा, आणि या मंडळासाठी नवीन इमारत बांधण्यासाठी स्वतंत्र्य जमीन संपादन केलेली असून सुद्धा इतका कालावधी लोटून सुद्धा अजून का अजून कोकण विभागीय शिक्षण मंडळाला हक्काची इमारत मिळत नाही!
दहा वर्षांपूर्वी स्वतंत्र्य कोकण विभागीय शिक्षण मंडळ स्थापन झाले आहे. तेंव्हा पासून हे मंडळ १० वर्षे भाड्याचे लाखो रुपये अदा करत आहे. जर कोकण विभागीय मंडळाच्या इमारतीसाठी जमीन संपादन केलेली आहे तर तेथे लवकरात लवकर इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी समविचारी मंचाने केली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी घेत असलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेमध्ये कोकण बोर्ड चमकदार कामगिरी करून राज्यात सर्वप्रथम येत असूनही या मंडळाला जागेपासून ते इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळाला आवश्यक त्या पुरेशा सोयी सुविधासाठी देखील दुसर्याच्या आधारावर राहावे लागत आहे.
रत्नागिरीमध्ये नवीन येणारे शैक्षणिक प्रकल्पांचे आम्ही स्वागतच करतो, परंतु जिल्ह्यात आधीपासून कार्यरत असणाऱ्या बाबींकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता भासत आहे, अशा धर्तीवर कोकण बोर्ड इमारत उभारणी तातडीने करण्यात यावी, अशी मागणी समविचारी मंचाचे बाबा ढोल्ये, महासचिव दळवी, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर, युवाध्यक्ष नीलेश आखाडे आदींनी केली आहे.