रत्नागिरी किनाऱ्यापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला बुडत असलेल्या तेलवाहू जहाजातील १९ जणांना भारतीय तटरक्षक दलाने वाचविण्यात यश मिळवले आहे. तटरक्षक दलाने १८ भारतीय आणि एका इथिओपियन मास्टरसह १९ जणांना मोटार टँकर जहाजाच्या सहाय्याने यशस्वीरीत्या वाचवले आहे.
तटरक्षक दलाला यूएईच्या खोर फक्कन येथून न्यू मंगलोरला जाणारे जहाज रत्नागिरीच्या किनाऱ्यायापासून सुमारे ४१ मैल पश्चिमेला सकाळी साडे नऊच्या दरम्यान बुडत असल्याची माहिती मिळाली. जहाजातून मदतीसाठी संदेश आल्यानंतर, काही क्षणातच पथक कार्यरत झाले. आयसीजीएस सुजीत आणि आयसीजीएस अपूर्व या परिसरात गस्त घालणारी दोन तटरक्षक जहाजे अपघातग्रस्त जहाजाकडे वळविण्यात आली. तसेच परिसरातील इतर व्यापारी जहाजांना देखील सतर्क करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा नेट आणि खबरदारीची सूचना देण्यात आली. तसेच सीजी हे प्रगत हेलिकॉप्टर या बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले होते.
जहाजावरील क्रू मेंबर्सना ‘एम टी पार्थ’ हे जहाज सकाळी साडे नऊच्या दरम्यान अचानक बुडत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जहाज पूर्ण बुडण्याची शक्यता असल्याचे ते वाचविण्याचे प्रयत्न सोडून दिले व मदतीसाठी संदेश पाठवला. त्याचवेळी तटरक्षक दलाकडून योग्य पद्धतीने बचाव कार्य करून या जहाजावरील १९ जणांची सुखरूप सुटका केली आहे. त्यांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. बनविण्यात आलेले सर्व कर्मचारी सुरक्षित आहे, अशी माहिती दलाकडून देण्यात आली. या जहाजातील तेल देवगड आणि विजयदुर्ग किनाऱ्यावर पसरणार असल्याने माशांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
समुद्रात आलेल्या संकटाच्या प्रसंगी सागरी तटरक्षक दल म्हणजेच ‘इंडियन कोस्ट गार्ड’ देशाच्या सागरी किनाऱ्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेले दल आहे. या तटरक्षक दलाचे मुख्य काम हे सागरी किनाऱ्यावर अनधिकृत किंवा अनियमित असे काही आढळले तर त्यावर तत्काळ योग्य ती कारवाई करणे असे आहे. सागरी तटरक्षक दलाचे मुख्य कार्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. या शिवाय या दलाचे चार प्रादेशिक विभाग असून त्यांची मुख्यालये मुंबई, चेन्नई, पोर्ट ब्लेअर, आणि गांधीनगर येथे आहे.