साथीच्या रोगांची पसरण जास्त करून सणासुदीच्या दिवसताच अधिक प्रमाणात होते. चिपळूण मध्ये गणेशोत्सवापासून शहर व लगतच्या परिसरात डेंग्यूसदृश रुग्ण काही प्रमाणात आढळायला सुरुवात झाली आहे. शासकीय रुग्णालयात अशा रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी खासगी रुग्णालयामध्ये मात्र संख्या वाढतच चालली आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात ४ बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरासह ग्रामीण भागात साथ पसरू नये, यासाठी आरोग्ययंत्रणा देखील तत्परतेने सर्व्हेक्षणाच्या सहाय्याने कामाला लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे अनेक रुग्ण सापडत असल्याचे दिसून येत आहेत. आणि हे रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल न होता खासगी रुग्णालयांत उपचार घेऊन बरे झालेले निदर्शनास आले आहे. ज्यांना नियमित औषधांनी विशेष फरक जाणवत नाही ते रक्त, लघवीच्या चाचण्या करून घेत आहेत. रुग्णाच्या शरीरातील पेशी कमी होत असल्याने ते शासकीय रुग्णालयावर आधारित न राहता शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
कामथे उपजिल्हा रुग्णालयातही काही रुग्णांवर उपचार सुरू असून काहींना घरी सोडण्यात आले आहे. काही रुग्ण तपासण्या न करता केवळ पेशी वाढविण्यासाठी घरगुती उपायांवर अधिक भर देत असून पपई, पपईच्या कोवळ्या पानांचा रस, किवी फळे खाण्यासह सलाईन लावून घेत बरे होताना दिसत आहेत. शहरात डेंग्यूबाधित रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची नोंद शासकीय यंत्रणेकडे होत नसल्याचे नक्की रुग्णसंख्येचा आकडा किती आहे त्याचे प्रमाण कळून येत नाही. खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला नावनोंदणीपासूनच विविध तपासण्या, चाचण्या व अन्य उपचारासाठी तब्बल २५ ते ३० हजाराच्या घरात खर्च येत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण डॉ. ज्योती यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात नगरपालिकेचा दवाखाना असून तेथे डेंग्यू रुग्णांवर उपचाराची सुविधा असून २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. शहरातील सर्व्हेक्षणासाठी ६ आरोग्यसेविका व १६ आशासेविका काम करत आहेत. तसेच कामथे उपजिल्हा रुग्णालयातही उपचारासही अॅडमिटची सुविधा आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तपासणी व उपचारासाठी सुविधा आहे. तेव्हा संबंधित रुग्णांची या सुविधांचा लाभ घ्यावा.