कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी बऱ्याचशा प्रमाणात कमी झाली होती. बेरोजगारी, गेलेल्या नोकर्या, उद्योगधंदे बंद, बेकारी, उपासमारी आदींमुळे मोठ्या प्रमणात गुन्हेगारी फोफावण्याची शक्यता होती; परंतु सर्वांनीच परिस्थितीची जाणीव ठेवत त्यातून सरळमार्गे सावरण्याचा प्रयत्न केला; परंतु गेल्या महिनाभरात रत्नागिरी शहर विविध प्रकारच्या गुन्हेगारीने हादरून गेले आहे.
अंमली पदार्थ आणि जुगार, हातभट्टीचे आणि ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे सोडले तर इतर गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण होते; परंतु बेपत्ता माजी सभापती स्वप्नाली सावंत यांचा कट रचून केलेल्या निर्घुण खुनानंतर रत्नागिरी एक प्रकारे हादरूनच गेली.
जिल्ह्यात एकापाठोपाठ एक असे गंभीर गुन्हे घडतच आहेत. लागोपाठ दोन खून आणि दिवसाढवळ्या लुटीचे प्रकार घडत असल्याने रत्नागिरीत एक प्रकारे अशांतता पसरली आहे. मिऱ्याबंदर येथे माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांचा गळा आवळून खून झाला. त्यानंतर तिथेच मृतदेह घराच्या मागे जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून,पुरावे नष्ट करण्यासाठी अस्थी आणि हाडे समुद्रात फेकल्याचा भयावह प्रकार उघड झाला. पूर्ण नियोजन करून पत्नीचा गळा आवळून खून केला, परंतु पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत स्वप्नाली सावंत हिचा खून झाल्याचे उघड केले.
शहर परिसरात दिवसाढवळ्या लुटमारीचे प्रकार सुरू झाले आहेत. लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यात काल ठाणे येथील सोने-चांदीच्या व्यापाऱ्याला रत्नागिरीतीलच एका सुवर्णकाराने गळा दाबून खून केला आणि मृतदेह गोणीत भरून आबलोलीत नेऊन टाकल्याचा सुन्न करणारा खुनाचा प्रकार घडला आहे. त्या मध्येच रिफायनरी विरोधात केंद्रातील मंत्र्यांना पोलिसांसमोर जिवंत जाळून मारण्याची धमकी देण्यात आली.
लुटीची प्रकरण ताजे असताना शहरात वयोवृद्धांना लक्ष्य करत त्यांना लुटणारी एक टोळी सक्रिय झाली आहे. उद्यमनगर भागात एका मुलाला पळवण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार होता. रामनाक्यावर महिलेला लुटले. माळनाक्यामध्ये देखील आम्ही पोलिस आहोत, तुमचे दागिने सुरक्षित राहण्यासाठी आमच्याकडे द्या, असे सांगत बनावट पोलिसांमार्फत महिलेची फसवणूक करण्यात आली.