अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील विशेष पोक्सो न्यायालयाने २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व २४ हजारांचा दंड ठोठावला. अक्षय शिवाजी गवड वय २३, रा. कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे. हा प्रकार मे ते ऑक्टोबर २०२० या कालावधीमध्ये घडला आहे.
१४ वर्षांची पीडित मुलगी राहात असलेल्या परिसरात आरोपी अक्षय भाड्याच्या घरात राहात होता. कोरोना कालावधीमध्ये दोघांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यातूनच त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण होऊ लागले आणि एका बंद घरात त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर पीडित मुलीला शारीरिक त्रास जाणवू लागल्याने, तिच्या नातेवाइकांनी तिला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नातेवाइकांनी मुलीशी या बद्दल चौकशी केली असता, तिने सर्व कहाणी सांगितली. नातेवाईकांनी तत्काळ शाहूपुरी-कोल्हापूर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गंभीर व श्वेता पाटील यांनी तपासकाम सुरु केले. तपासात पोलिसांनी आरोपी अक्षय गवडला अटक केली. तपासकामात शासकीय रुग्णालयातून दोघांचा डीएनए अहवाल जुळला होता. तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
शुक्रवारी ता. २३ रोजी या खटल्याचा निकाल विशेष पोक्सो न्यायाधीश व्ही. ए. राऊत यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. त्यांनी या खटल्यात १८ साक्षीदार तपासले, तर आरोपीतर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. विशेष पोक्सो न्यायालयाने अल्पवयीन मुलीची लैंगिक फसवणूक प्रकरणी, आरोपी अक्षय गवड याला २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व २४ हजारांचा दंड ठोठावला.