जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध सभा, नेते मंडळी, राजकारण्यांचे दौरे , वाढदिवस, सणाच्या शुभेच्छा असलेले अनेक फलक रस्त्यावर आणि चौकामध्ये लावलेले दिसून येत आहेत, त्यावर आता चिपळूण नगर पालिकेने कारवाईचे धोरण हाती घेतले आहे. पालिकेने अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत १०० हून अधिक फलक व बॅनर जप्त करण्यात आले आहेत.
चिपळूण पालिकेची परवानगी न घेता शहरातील मुख्य चौक आणि मुख्य मार्गावर अवैधरित्या फलक आणि बॅनर लावले गेल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून, नियम देखील सर्व धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. या विरोधात पालिकेने अवैध फलक व बॅनरविरोधात जप्तीची मोहीमच हाती घेतली आहे.
मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागप्रमुख टोपरे यांच्या पथकाने ही कारवाई सुरू केली. शहरातील विविध चौक आणि मुख्य मार्गालगत अवैधपणे लावलेले फलक, होर्डिंग व बॅनर हटवले जात आहेत. त्यामुळे अवैध फलक लावणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, पालिकेने या मोहिमेचे कायम सातत्य ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.
यापूर्वी अनेकवेळा पालिका केवळ तीन ते चार दिवस ही मोहीम राबवून नंतर याकडे दुर्लक्ष करत असल्याचा अनुभव शहरवासीयांना आला आहे. त्यामुळे पालिकेला या माध्यमातून प्राप्त होणारा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत असल्याचे चित्र आहे. पालिकेची परवानगी न घेता अवैधपणे फलक व बॅनर लावणाऱ्यांविरोधात जप्त व फौजदारी कारवाई करण्याची तरतूद आहे; पण, पालिकेकडूनच याची कडक अंमलबजावणी केली जात नाही, अर्थात यामागे कारणे देखील विविध आहेत.
वास्तविक नेत्यांचे वाढदिवस तसेच विविध कार्यक्रमाचे होर्डिंग व बॅनर लावताना पालिकेची परवानगी व शुल्क भरणे गरजेचे आहे; पण, कुणीही या प्रक्रियेवर गांभीर्याने पाहत नसल्याने पालिकेचा लाखो रुपयांचा महसूल बुडित निघत आहे.