रत्नागिरी आणि लगतच्या परिसरामध्ये लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीने विविध समाज उपयोगी कामे करून रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून म्हणजेच मार्च २०२० पासून ते आता जून २०२१ पर्यंत लायन्स क्लबच्या पदाधिकारी ला.श्रेया केळकर, मनाली राणे आणि डॉ. शिवानी पानवलकर यांनी सर्व कामांची नियोजपूर्वक आखणी करून रत्नागिरी परिसरातील विविध गावा गावामधून लायन्स क्लबच्या वतीने मदतकार्याचे काम हाती घेतले आहे.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने विविध शिबिरांचे आयोजन केले गेले होते. त्यामध्ये आरोग्य तपासणी,डोळे तपासणी, तसेच ग्रामीण भागातील शाळांमधून मुलींच्या आरोग्य बाबत तक्रारीचे निवारण योजनेची अंमलबजावणी केली,गरजू गरीब लोकांना, शेतकऱ्यांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केली. अनेक विविध विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार अशा ४०० हून अधिक सेवेचे कार्य लायन्स क्लब रत्नागिरी गेले वर्षभर करत आहे.
जिथे सगळ विश्व कोविड महामारीमुळे ठप्प झाले आहे, तिथे लायन्स क्लब मात्र सतत मदतीसाठी कार्यशील आहे. आणि या केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल लायन्स इंटरनॅशनल कडून घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ५०८ क्लबच्या काल पार पडलेल्या लायन्स मल्टिपलच्या २० हजाराहून जास्त सदस्यामधून सामाजिक कार्यामध्ये अव्वल ठरणाऱ्या लायन्सच्या पदाधिकारी अध्यक्षा ला.श्रेया केळकर यांना बेस्ट प्रेसिडेंट मल्टिपल म्हणून तीन गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले. तर सचिव मनाली राणे यांना उत्कृष्ट सचिव कार्य केल्याबद्दल सिल्व्हर मेडल देण्यात आले आणि लायन्स क्लब रत्नागिरीच्या खजिनदार पदावर असलेल्या रत्नागिरीतील नामवंत डॉ. शिवानी पानवलकर यांना मल्टिपल मधील बेस्ट खजिनदार साठी प्लॅटिनम अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. तसेच लायन्स क्लब रत्नागिरीचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक डॉ. संतोष बेडेकर यांनी ही लायन्स मधील भरीव कामगिरीबद्दल गोल्ड मेडल देऊन गौरवण्यात आले. लायन्स क्लब रत्नागिरीच्या या कर्तुत्ववान यशस्वी सदस्यांवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.