‘हॅरी पॉटर’ या चित्रपट मालिकेत हॅग्रीडची भूमिका करणारा अभिनेता रॉबी कोलट्रेन यांचे शुक्रवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी निधन झाले. रॉबी ७२ वर्षांचे होते. ही बातमी ऐकून हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
रॉबी कोल्टरेन यांचा जन्म ३० मार्च १९५० ला स्कॉटलंडमध्ये एका शिक्षक आणि डॉक्टर दाम्पत्याच्या पोटी ग्लासगोमध्ये झाला. त्यांचं मूळ नाव अँटनी रॉबर्ट मॅकमिलन होतं. ग्लासगो आर्ट स्कूलमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर एडीनबर्गमधील मोरेय हाऊस कॉलेज ऑफ एज्यूकेशन येथे त्यांनी पुढील शिक्षण घेतलं. रॉबीची एजंट बेलिंडा राइट यांनी एका निवेदनात याची पुष्टी केली आणि सांगितले की, ‘रॉबी काही काळापासून आजारी होता. यानंतर त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रॉबीच्या एजंटने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘रॉबी खूप प्रतिभावान व्यक्ती होती. त्याने सलग ३ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार जिंकला आणि यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले. ‘हॅरी पॉटर’ चित्रपटात हॅग्रीडच्या भूमिकेत येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत तो सर्वोत्कृष्ट लक्षात राहील. जगभरातील मुलांच्या आणि प्रौढांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही भूमिका होती.
रॉबी कोलट्रेनला खरी ओळख ‘हॅरी पॉटर’मधून मिळाली. ‘हॅरी पॉटर’ मालिकेतील चित्रपटांशिवाय तो ‘क्रॅकर’ या गुप्तहेर नाटकातही दिसला. त्याची कॉमेडी चाहत्यांना खूप आवडली. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच रॉबी लेखकही होता. जेम्स बाँडच्या दोन चित्रपटांमध्ये देखील त्यांनी अभिनय केला. २०१९ नंतर त्यांनी हॅग्रीडस मॅजिकल क्रिएचर्स मोटरबाइक अॅडवेंचर्समध्ये भूमिका केली होती.