रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या शेतीच्या कामाला सुरुवात झाली असून, चिपळूण तालुक्यातील शेतकर्यांमार्फत कृषी अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण विविध शेतीचे प्रयोग राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. लोकांच्या सहभागातून अशा प्रकारचे शेतीमधील उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी राहुल अडके यांनी दिली.
चिपळूण तालुक्यामध्ये या वर्षीच्या शेतीच्या खरीप हंगामामध्ये २० हेक्टर क्षेत्रावर रत्नागिरी-७ या लाल भाताचे २५० किलो बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. लाल भातामधील ५० टक्के बियाणे हे पुढील वर्षीच्या हंगामामध्ये लागवडीसाठी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर रत्नागिरी-८ या काळ्या भाताच्या वाणाचे ९५० किलो बियाणे शेतकर्यांना वाटण्यात आले आहे. या काळ्या भाताचे १०० किलो बियाणे पूर्णत: लोकसहभागातून करण्यात आले आहे. २५ हेक्टर जमीनक्षेत्रावर या काळ्या भाताच्या वाणाची लागवड करून उत्पादन घेतले जाणार आहे.
त्याचप्रमाणे दापोली-२ या वनिन वाणाचे सुद्धा १०० किलो बियाणे शेतकर्यांना देण्यात आले आहे. २० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड केली जाणार असून, येणाऱ्या उत्पादनावरून भविष्यात हे क्षेत्र वाढविण्याकडे भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे अनुदान तत्वावर २२५ किलो नाचणीचे वाटप करून, ६५ हेक्टर क्षेत्रावर नाचणीचे उत्पादन घेण्यात येणार आहे.
काळ्या आणि लाल भातामध्ये असलेल्या विविध उपयुक्त अन्नघटकांमुळे हा भात आरोग्यवर्धक असल्या कारणाने या भाताचे उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहित केले जात आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग केल्याने शेतकऱ्याची आर्थिक क्षमता वाढेल, त्यामूळे शेती व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याला या बियाण्यांची शेती करणे नक्कीच सकारात्मक ठरणार आहे.