रत्नागिरी महावितरण कंपनी वीजबिलाच्या वाढत्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडली आहे. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे घरी येऊन वीज मीटरचे रीडिंग घेणे थांबवण्यात आले होते. त्यामुळे मागील बिलाच्या आधारावर सरासरी बिल काढण्यात आलीत. पण आलेली बिले एवढी जास्त रकमेची होतीत कि, ग्राहकांना ती वेळेत भरणे शक्य झाले नाही.
कोरोनामुळे अनेक जणांचे रोजगार गेले, अनेक जणांचे व्यवसाय ठप्प झाले, सर्वच घरी असल्याने घरातील विजेवर त्याचा जास्त ताण पडल्याने वीज मीटर पण चांगलेच फिरले. पण काही ठिकाणी वापरापेक्षा वीजबिल जास्त आल्याने ग्राहकांनी तक्रार केली. तर त्यावर आलेले वीज बिल भरावेच लागेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
उर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही एवढ्या वाढीव वीजदरामध्ये काही अंशी सवलत मिळेल असे जाहीर केलेले, त्यामुळे ग्राहक सुद्धा काहीतरी सवलत मिळेल या आशेवर राहिल्याने वीज बिलामध्ये अजून वाढच होत गेली. आणि अचानक मग महावितरणाने बिल वेळेत भरले नाही तर वीज तोडणी करण्याचे जाहीर केले. महावितरणापुढे असलेले वीज बिल वसुलीचे आव्हान लक्षात घेता, शेवटचा उपाय म्हणून जे थकबाकीदार आहेत, त्यांची विजेची जोडणी खंडित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये कंपनीने ग्राहकांना एसएमएस द्वारे किंवा ऑनलाईन विजेचे मीटर रीडिंग पाठविण्याची उपलब्धता करून दिली होती. परंतु, तरीही वीज ग्राहक विजेचे बिल भरण्याकडे दुर्लक्ष कात असल्याचे निदर्शनास आल्याने महावितरणाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता, थकबाकीदार ग्राहकांनी आपले वीज बिल देयक तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे , वीजबिलामध्ये कोणतीही तडजोड करता येणार नसल्याचे मुख्य अभियंता सायनेकर यांनी सांगितले.