कोकण म्हणजे फळाफुलाने समृद्ध असा परिसर आहे. त्यामुळे, विविध प्रकारच्या फळाची उत्पन्न विविध भागाच्या वातावरणानुसार घेतली जातात. कोकणातील फळांमध्ये आंबा व काजूचे उत्पन्न अधिक प्रमाणात घेतले जाते. यात दापोली तालुक्यामध्ये ३४८.६१ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचा फटका फळलागवडीला बसत असल्याचे सद्यःस्थितीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. दापोलीत माकडांचा त्रास मोठा आहे. तयार झालेल्या फळ पिकाची नासधूस वन्य प्राणी करत असल्याने, बागायतदार फळझाडे लावण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हाती तोंडी आलेले पिक डोळ्यासमोरच नाश होत पावल्याने शेतकरी आणि व्यावसायिक देखील त्रस्त झाले आहेत.
माकडांमुळे होणारे मोठे नुकसान तसेच लागोपाठच्या होणाऱ्या निसर्गाच्या प्रकोपामुळे देखील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. थंडी पुरेपूर न पडल्यास व ऊन अधिक पडल्यास आंब्याचा मोहोर करपून जातो तर कधी अवकाळी पाऊस पडतो. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला आंबा खराब होऊन जातो.
त्यामुळे प्रत्येक वेळा होणारे हे नुकसान पाहता नव्याने बागायती रुजवून करण्याकडे शेतकरी पाठ फिरवताना दिसून येत आहेत. यामुळे नव्या लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या बागायतदार बागेत असणार्या झाडांची जोपासना करत आहेत. दापोलीत आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या मोठ्या बागा आहेत; परंतु माकडांच्या त्रासामुळे बागायतदार नाराज असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बागायतदारांकडून होत आहे. त्यामुळे जो पर्यंत, या उपद्रवी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत, नवीन पिक घेण्याचा विचारही हे शेतकरी आणि व्यावसायिक करू शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.