26.7 C
Ratnagiri
Saturday, July 19, 2025

हरचिरी धरणामुळे वाढणार १५९ दशलक्ष लिटर पाणीसाठा

उद्योगांसाठी आणि शहरानजीकच्या गावांच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा...

आरजू फसवणूकप्रकरणी गुंतवणूकदारांचा उपोषणाचा इशारा

रत्नागिरीमध्ये आरजू नावाच्या कंपनीने व्यवसाय देतो, असे...

पावसाने जनजीवन विस्कळीत, झाड पडून तिघे जखमी

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात सोमवारपासून जोरदार...
HomeRatnagiriराज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र - मंत्री उदय सामंत

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

राज ठाकरेंनी बोलावल्यास केव्हाही भेटीला जाऊ असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले; परंतु त्यांच्या भाषणांमध्ये राज ठाकरे मराठीच्या अस्मितेसाठी, तर दुसरे ठाकरे खुर्चीसाठी एकत्र आल्याचे दिसत होते. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदीचा अहवाल स्वीकारला होता, हे ते विसरले आहेत. त्यांच्या भाषणात सरकारवर टीका करण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यापलीकडे काहीच नव्हते. त्यांचे भाषण मराठीसाठी नव्हते, तर सत्तेच्या हव्यासापोटी होते. उबाठाने आधी काँग्रेसला मराठी शिकवावे, असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लगावला. हॉटेल सावंत पॅलेस येथे पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, ‘दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणे आपण ऐकली. राज ठाकरेंच्या भाषणात मराठीबद्दलची आत्मीयता दिसून आली. त्यांनी भाषणात कुठेही राजकारण आणले नाही. कोणावरही टीका केली नाही.

केवळ आपली मराठी भाषा टिकली पाहिजे, तिचा आत्मसमान वाढला पाहिजे, या हेतूनेच त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे ती खरी मराठी अस्मितेची भूमिका होती. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात मराठीची आत्मीयता नव्हती तर केवळ खुर्चीसाठी एकत्र आल्याचे दिसत होते. काँग्रेसने या मेळाव्याला उपस्थित राहणे टाळले. यावरून काँग्रेस मराठी भाषेच्या विरोधात आहे का? की, त्यांनाही हिंदी हवी आहे? याचा जाब आता उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला विचारणे गरजेचे आहे. यापुढील आंदोलन त्यांनी काँग्रेसच्या विरोधात केले पाहिजे.

त्यांनीच हिंदी भाषेचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर राज्य सरकारने हिंदी ऐच्छिक ठेवली होती. कोठेही हिंदीची सक्ती करण्यात आली नव्हती. हिंदीला विरोध झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ऐच्छिक हिंदीचाही निर्णय मागे घेण्यात आला. हा लोकभावनेचा आदर होता. कोणाच्याही दबावापोटी सरकारने हा निर्णय घेतलेला नाही; पण राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या साह्याने मनसेचा आधार शोधला,’ अशी टीका सामंत यांनी केली.

राज ठाकरेंनी बोलावल्यास केव्हाही भेटीला जाऊ – राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्ही एकत्र आलो, असे सांगितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यामुळे दोन भाऊ एकत्र आले असतील तर आनंदच आहे, अशा शब्दात प्रतिक्रिया दिली. यातून त्यांची राजकीय परिपक्वता दिसून आली. राज ठाकरे यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. त्यांनी गप्पा मारण्यासाठी वेळ दिला तर आपण केव्हाही त्यांच्या भेटीसाठी जाऊ, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular