साखरपा नजीकच्या किरबेट-भोवडे-देवडे गावातून वाहणाऱ्या गडनदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याबाबत भोवडे ऐक्यवर्धक संघाने लक्ष वेधले आहे. गडनदी भोवडे गावातून वाहते. या नदीत स्वातंत्र्यानंतर जवळपास सात दशकांनी नदीवर पूल बांधण्यात आला. या उपशामुळे नदीवरील पुलाला धोका निर्माण झाल्याचे संघाने निदर्शनास आणले आहे. पुलाच्या खांबाकडील बाजूनेच मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करण्यात येत असल्याने, खांबाला देखील धोका उत्पन्न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पुलाखालीच अवैध वाळू उपसा होत असल्याचे भोवडे मराठवाडी ऐक्यावर्धक संघाचे म्हणणे आहे. त्याबाबत त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार नदीच्या खांबा खालीच हा उपसा होत असल्यामुळे खांबांचा आधार कमकुवत होत आहे. वाळू उत्खननावर शासनाने बंदी घातलेली असून देखील, अनेक ठिकाणी अवैध रित्या वाळू उपसा केला जात असल्याने तेथील भाग नापीक होत असून, किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होऊन परिसराचा ऱ्हास होत आहे.
नदीपात्रात धूप होणे, पाणी साठवून ठेवणाऱ्या कोंडी नष्ट होणे, भूगर्भातील जलस्तर पातळी खालावणे असे परिणाम दिसून येत आहेत. पर्यायाने विहिरींची पातळी देखील खोल जात आहे. स्थानिक लगतच्या परिसरातील पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतावर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. याबाबत संघाच्या सर्वसाधारण सभेत ठराव करण्यात आला असून सदर परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे पत्र किरबेट-भोवडे-देवडे ग्रुपग्रामपंचायतीला दिले आहे. त्यांनी वाळू उपशाला प्रतिबंध करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.