रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील ३६ विद्यार्थ्यांना आता आपल्या देशाची अंतराळ संशोधन करणारी संस्था इस्रो आणि अमेरिकेची नासा या ठिकाणी भेट देऊन तिथल्या कार्याची माहिती घेता येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने मिशन गगनभरारी या उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नासा, इस्रोला भेट देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे.
मंडणगड तालुक्यात केंद्रस्तरावर ११८३ विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कुंबळे, मंडणगड, देव्हारे या तीन केंद्रात बीटस्तरावर दि. ८ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला मराठी १५५ व उर्दू ८ असे एकूण १६३ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यातून प्रत्येक बीटमधून निवडण्यात आलेल्या ३० विद्यार्थ्यांची रविवारी दि. ११ परीक्षा होणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावर परीक्षा घेऊन प्रत्येक तालुक्यातील ३ प्रमाणे २७ विद्यार्थी निवडले जाणार आहेत. तसेच इस्रो भेटीसाठी नऊजणांची यादी तयार केली जाईल. त्यात सातवीमधील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ९ जणांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना नासा, इस्रो भेटीची संधी मिळणार आहे.
या उपक्रमातंर्गत २ मार्चला नासा स्पेस सेंटरमध्ये होणाऱ्या मार्स फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, जॉन्सन स्पेस सेंटर, सायन्स म्युझिअम कॉलॅब्रेटिव्ह इंटरनॅशनल स्पेस सेंटर पाहता येणार आहे. त्याचबरोबर कॅनडी स्पेस सेंटरमध्ये शटल प्रक्षेपणासह लिफ्ट ऑफ अनुभवता येणार आहे. शिवाय नासामध्ये असलेल्या चंद्रावरील तुकड्याला स्पर्श करण्याचीदेखील संधी मिळणार आहे.
हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आणि संशोधक वृत्तीला वाव देण्याच्यादृष्टीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या हेतूने या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुकास्तरावर चाळणी परीक्षा घेण्यात येत आहे. मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार आहे. आकाशगंगा, अंतराळाबद्दल विद्यार्थ्यांना कुतूहल आहे. त्यावर काहीजण अभ्यास, संशोधनदेखील करतात आणि माहितीदेखील घेत असतात. ग्रामीण भागात क्षमता असते; पण योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे देखील विद्यार्थी मागे पडतात