गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्था वरवेली गुहागरमध्ये नुकताच जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेमा केअर लोटे कंपनीचे डायरेक्टर परमार, पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिल जोशी, वरवेली सरपंच पूनम रावणंग, अॅक्युप्रेशर व मसाज स्पेशालिस्ट डॉ. बहुतुले उपस्थित होते.
लेमा केअर कंपनी लोटेचे चेअरमन परमार आणि मनसेचे तालुका संपर्कप्रमुख प्रमोद गांधी यांनी अपंग संस्थेला कायम सर्वतोपरी मदत करण्यास कार्यतत्पर राहू असे आश्वासन दिले. जागतिक दिव्यांग सहाय्यता दिना निमित्त गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचा २० व्या वार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच गरजू दिव्यांगांना व्यवसाय करण्यासाठी शीतपेटीचे वाटप करण्यात आले.
तसेच वेगवेगळ्या कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेला अधिकृत नोंदणी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे अरुण मुळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार बच्चू कडू व सर्व मंत्रिमंडळ यांचे देखील आभार आणि अभिनंदन करण्यात आले.
पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते यांनी देखील तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र पोलिस कर्मचारी नेमला जाईल आणि गुहागर पोलिस ठाण्याकडून या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन केले. गुहागर तालुका अपंग पुनवर्सन संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले. दिव्यांगाच्या समस्या वेळेत सोडविण्यासाठी स्वतंत्र पोलिस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार असल्याने गुहागर तालुक्यातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.