ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या अपहाराविषयी ते म्हणाले, चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस ठेकेदारांच्या नावे सुरक्षा अनामतची रक्कम जमा करून ४ कोटी ८ लाखाचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी कार्यकारी अभियंता अमरसिंग रामसे यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक जीवन मारूती खंडजोडे, प्रतीक प्रमोद भिंगार्डे यांच्यासह ८ जणांना अटक पोलिसांनी अटक केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातील चार कोटीच्या अपहार प्रकरणी खातेनिहाय चौकशी झाल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. आतापर्यत या प्रकरणात आठ जणांना अटक झाली आहे. या प्रकरणी अजुनही काहींचा समावेश असून त्यांनाही लवकरच अटक होईल. या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवरच कडक कारवाई जोणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, सार्वजनिक बांधकाम विभागात चुकीच्या पद्धतीने ठेकेदारांच्या बँक खात्यावर रकमा जमा करण्यात आल्या आहेत. या बाबींची येथील अधिकाऱ्यांना कुणकुण लागल्याने शोध घेतला असता, काही जणांची माहिती मिळाली आणि अपहारात सहभागी असलेल्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात आली. त्यावेळी चौकशीत अपहार झाल्याचे समोर आले. कार्यकारी अभियंत्यांना लिपिकांवर फौजदारी दाखल करण्याची मान्यता आपण दिली आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू राहणार आहे.
सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने, मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. गल्ली ते दिल्लीपर्यत शत प्रतिशत भाजप असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापुर्वीच नारा दिलेला आहे. बहुसंख्या गावात भाजपचा सरपंच आणि सदस्य झाले पाहिजेत. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सामुहिक प्रयत्न करायला हवेत अशा सूचनाही त्यांनी केल्या.