रत्नागिरी मागील पंधरा दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे. सध्या खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने शेतीच्या कामांनीही वेग घेतला आहे. रत्नागिरी मध्ये पडणारा पाऊस जरी जास्त प्रमाणात असला तरी शेतीला पूरक असे वातावरण आणि पाण्याचा साठा झाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे.
रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाने शेतकऱ्यांसाठी किसान भातपीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. हि स्पर्धा घेण्यामागे कोरोनाच्या नैराश्यमय परिस्थितीतून बाहेर पडून केवळ शेतकर्यांचा उत्साह वाढवून त्यांना विविध प्रकारे प्रोत्साहन देणे हाच उद्देश असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळ माने यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी स्पर्धेच्या नियमावली बद्दल आणि हि स्पर्धा कोणत्या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे त्याबद्दल माहिती दिली आहे.
त्यामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील स्पर्धेसाठी किमान एक एकर क्षेत्रावर एका शेतकऱ्याची किंवा शेतकरी गटाची भात लागवड असणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत हद्दीमधील किमान ३० शेतकरी किंवा शेतकरी गट या स्पर्धेमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे, किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये किमान ३० एकर क्षेत्रावर सहभागी स्पर्धकांनी भात लागवड केलेली असली पाहिजे. त्यातील ५०० क्विन्टल भाताची विक्री रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाला करावी लागेल. केंद्र शासना कडून जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे शेतकऱ्याना पैसे दिले जाणार आहेत.
सर्वात जास्त भात विक्रीसाठी पाठवणाऱ्या तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींनाआकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील विजेत्या स्पर्धकांवर बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेच्या सहभागाची अंतिम तारीख हि १५ जुलै असल्याची नोंद घ्यावी, असे रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाकडून आवाहन करण्यात आले आहे.