मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे टोल नाका उभारण्यात आला आहे. या ठिकाणी टोलवसुलीसाठी ठेकेदार नियुक्त करून त्याला टोलवसुली करण्याचे निर्देशही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. मात्र, महामार्गाचे काम देखील अद्याप पूर्ण न झाल्याने, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे रखडलेले मोबदले इत्यादी विविध कारणांसह टोलनाक्यावरील कर्मचारी नियुक्तीमध्ये स्थानिकांना प्राधान्य, तालुक्यातील वाहनांना मोफत टोलवसुली आदी विविध मागण्या करत सर्वपक्षीयांसह वाहनचालक आणि राजापूरवासीयांकडून या टोलवसुली विरोध केल्याने टोलवसुली बंद ठेवण्यात आली.
खर तर ठेकेदाराकडून आजपासून टोलवसुली सुरु करण्यात आल्याने, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह वाहनचालकांनी पुन्हा एकदा टोलवसुली विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. मागण्यांची जोपर्यंत पूर्तता होत नाही, तोपर्यंत टोलवसुली करण्यास विरोधच करणार. वाहने थांबवून भर रस्त्यामध्ये काहींनी ठिय्या मांडत टोलवसुली विरोधात आंदोलन छेडल्यामुळे महामार्गावरील टोलवसुलीविरोधी आंदोलनाला पहिल्याच दिवशी उग्र वळण लागले.
याबाबतची माहिती मिळताच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष अशफाक हाजू, सौरभ खडपे, अरविंद लांजेकर, रविंद्र नागरेकर, अभिजित गुरव, सुभाष बाकाळकर, रामचंद्र सरवणकर, प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ आंबेरकर आदींसह वाहनचालकांनी टोल वसुलीविरोधात आक्रमक पवित्रा घेत त्याला कडाडून विरोध दर्शविला. या वेळी हाजू, लांजेकर, खडपे, कोरगावकर, मनोज सप्रे आदींनी रस्त्यामध्ये ठिय्या मांडत टोलवसुली विरोधात घोषणाबाजीही केली. ठेकेदाराला टोलवसुली करू नये, अशी सूचना केली.
भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी भ्रमणध्वनीद्वारे टोलवसुली करणाऱ्या ठेकेदारासह लोकांशी संवाद साधला. त्यांनी टोलवसुलीला आक्रमकपणे विरोध करताना दि. २२ पर्यंत टोलवसुली न करण्याची सूचना केल्याने, टोलवसुली तत्काळ थांबवण्यात आली असून दि. २२ ला सकाळी १० वा. माजी खासदार राणे राजापूर वासीयांसमवेत ठेकेदारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर टोलवसुली संबंधित पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.