हवामान खात्याकडून जिल्ह्यातील काही भागामध्ये तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविलेला असताना शुक्रवारी सायंकाळी राजापूर तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल परिसरामध्ये सोसाट्याच्या वारा आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडला. पाचल परिसरामध्ये अवकाळी पाऊस पडला असला तरी, शहरासह पश्चिम भागामध्ये पाऊस पडला नाही. मात्र ढगाळ वातावरण होते. हवामानामध्ये अचानक झालेले परिवर्तन आणि पडलेला अवकाळी पाऊस याचा आंबा आणि काजू पिकावर प्रतिकूल परिणाम होवून नुकसान होण्याची भिती बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे.
गेले दोन दिवस तालुक्यामध्ये कमालीचे तापमान राहीले आहे. दिवसभर कडाक्याचे ऊन अन् ‘जोडीला उकाडा होता. या बदलेल्या वातावरणाने सारेच हैराण झाले होते. या वातावरणामध्ये शुक्रवारी फारसा काही बदल झालेला नव्हता. अशा स्थितीमध्ये हवामान खात्यांकडून जिल्ह्याच्या काही भागामध्ये तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरताना तालुक्याच्या पूर्व भागातील पाचल परिसरामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडला.
नेहमीप्रमाणे शुक्रवारी दुपारपर्यंत पाचल परिसरामध्ये कडाक्याचे ऊन होते. मात्र, सायंकाळी ४ वा. च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होवून अचानक सोसाट्याचा वारा आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला. सुमारे दहा-पंधरा मिनिटं वारा आणि गडगडाट सुरू असताना त्याच्या जोडीने पावसाच्या सरीही कोसळायला सुरूवात झाली. सुमारे पंधरा-वीस मिनीटं पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला होता. या अवकाळी पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये आंबा-काजू झाडावरील तयार फळे पडून बागायतदारांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.