मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल २०२३ ते १० मे २०२३ या कालावधी दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या कालावधीत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्रसिंग यांनी दिले आहेत. या कालावधीमध्ये हलक्या वाहनांची वाहतूक ही आंबडस-चिपळूणमार्गे वळविण्यात येणार आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळेला त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल आणि नव्या वर्षांम ध्ये रत्नागिरीकर आणि कोकणवासीय. चौपदरीकरण झालेल्या महामार्गावरून वाहने चालवतील, असा आश्वासन दिलं होतं. त्यानंतर या कामांने वेग घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गामध्ये अनेक घाट आणि अवघड वळणे आहेत. त्यातीलच एक परशुराम घाट असून या परशुराम घाटातल्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. साधारण ५.४० किमी इतक्या लांबीचा हा घाट असून त्यातील ४.२० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण झाल आहे.
मात्र उर्वरित १.२० किमी भाग हा डोंगररांगा आणि खोल दरीचा असल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामासाठी अवघड स्वरूपाचा आहे. त्यामुळे हे काम करताना घाट वाहतूकीसाठी बंद करावा अशी मागणी हे काम करणाऱ्या कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. या नियुक्त ठेकेदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तर रत्नागिरी विभागासह येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण रायगड यांनीही ही मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस विभाग तसेच उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्याकडून अहवाल मागवला होता. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून २५ एप्रिल २०२३ ते १० मे २०२३ या कालावधी दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वाजेपर्यंत परशुराम घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून बंद कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस – चिपळूण मार्गे वळविण्यात येणार आहेत असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.