जिल्ह्यातील नागरिकांना लवकरच एसटीचा प्रदुषणमुक्त प्रवास करावयाला मिळणार आहे. रत्नागिरी एसटी विभागात चार ठिकाणी इलेक्ट्रिक बसेससुद्धा दाखल होणार आहेत. रत्नागिरी आगार ३७, दापोली ३६, चिपळूण ३३० आणि खेडला ३१ अशी १३७ गाड्यांची मागणी प्रस्तावित आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची जागासुद्धा निश्चित करण्यात येत आहेत. याशिवाय संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. पुढील तीन- चार महिन्यांत इलेक्ट्रिक बसेस दाखल होतील, अशी माहिती एसटीचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदूषण टाळण्यासाठी एसटीच्या गाड्या सीएनजी व इलेक्ट्रिकवर करण्यावर जास्त लक्ष दिले जात आहे. प्रवासी एसटीकडे वळू लागले आहेत. त्यांच्याकरिता अद्ययावत सोयीसुविधा देण्याकडे महामंडळाचे लक्ष आहे. लाल परी या सीएनजीवरील अप्रतिम गाड्याही रत्नागिरी एसटी विभागात कार्यरत आहेत.
पहिल्या टप्प्यातील ३० गाड्या रत्नागिरीत सुरू असून लवकरच रत्नागिरी चिपळूणं करिता एकूण १२० गाड्या मिळणार आहेत. एसटीच्या सीएनजीवरील बसेससाठी माळनाका येथे एसटीच्या आवारात सीएनजी पंप उभारण्यात आला असल्याचे बोरसे म्हणाले. रत्नागिरी एसटी विभागात सध्या. ७६० बसेस आहेत. यामध्ये शिवशाही, लाल परी असून इलेक्ट्रिक बसेससुद्धा दाखल होणार आहेत.