रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता, विविध प्रकारचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गावोगावी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा कमी होण्यासाठी संचारबंदी, आठवड्याचा कडक लॉकडाऊन असे एक न अनेक उपाय जिल्हा शासन आणि आरोग्य यंत्रणा अवलंबत आहे. परंतु, ते तितकेसे प्रभावी ठरले नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे सोनारानेच कान टोचावे या उक्तीप्रमाणे एरव्ही प्रशासन नागरिकांना कोरोना अलर्ट करत असताना सुद्धा काही बेजबाबदार मंडळीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी आत्ता चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींची मदत घेतली आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील सिने कलाकार प्रशांत दामले, निर्मिती सावंत, वैभव मांगले यांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेले गेल्या काही दिवसापासून दिसत आहेत. या सर्व कलाकारांची नाळ कोकणाशी जोडली गेली आहे.
रत्नागिरीसाठी मराठी चित्रपट सृष्टीतील लाडके सिनेकलाकार कोरोनाची जनजागृती करताना दिसल्यावर काही प्रमाणात तरी त्याचा प्रभाव रत्नागिरीतील जनतेवर पडेल अशी आशा आहे. कोरोना फैलाव वाढण्यासाठी एक न अनेक कारणे आहेत. पण तो कुठेतरी नियंत्रित होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे सिने कलाकार आपल्या व्हिडीओमध्ये रत्नागिरीकरानो, कोरोना अजून संपलेला नाही, कोरोनाचे शासनाने घालून दिलेले नियमांची काटेकोरपणे अमलबजावणी करून, जिल्हा कोरोनामुक्त करूया, पोलीस, डॉक्टर आपली जबाबदारी विश्वासाने पेलत आहेत, तर आपणही आपली जबाबदारी ओळखून शासनाच्या धोरणांचा अवलंब करून नियमांचे पालन करून कोरोनाला जिल्ह्यातून पळवून लावूया, महत्वाचे म्हणजे लसीकरण प्रत्येकाने अवश्य करून घ्या, अशा प्रकारची विविध आवाहने केली जात आहेत.