प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे ९ ते १२ जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. जे मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असतील, त्यांनी किनारी परतावे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून, वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिक, पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाकडून दिलेल्या सूचनेनुसार, जिल्ह्यात वेगवान वारे वाहत आहेत. गेले दोन दिवस जिल्ह्यात किनारी भागात वेगवान वारे वाहत आहेत. काल (ता. ८) भरती आणि वादळाचा परिणाम किनारी भागात जाणवला. गणपतीपुळेत मोठ्या लाटा किनारी भागातील स्टॉलमध्ये शिरल्या होत्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले नसले, तरीही पर्यटकांसाठी धोकादायक ठरणाऱ्या आहेत. आजही किनारी भागात वेगवान वारे वाहत होते. वादळाचा प्रभाव पुढील तीन दिवस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार उद्या (ता. १०) जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग ३०-४० किमी प्रतितास राहील, तसेच गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.
रविवारी (ता. ११) जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ आणि बाहेर ३५-४५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. सोमवारी (ता. १२) जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कर्नाटक- गोवा-महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहील आणि समुद्राजवळून ४०-५० किलोमीटर, तर कमाल ५५ ते ६० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर, कर्नाटक-गोवा महाराष्ट्र किनाऱ्याजवळ समुद्र खवळलेला राहील. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असल्याने नागरिकांनी पोहण्यासाठी समुद्रात उतरू नये, समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नयेत.