रत्नागिरीतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणारी आविष्कार हि संस्था आहे. हि संस्था कायमच मतीमंद मुलांच्या आयुष्याला चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्नशील असते. सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा हि मुल वर्तनाने, दिसण्याने वेगळी भासतात परंतु, या मुलांनाही इतरांप्रमाणे कला, शिक्षण अवगत व्हावे यासाठी आविष्कार मधील शिक्षक वर्ग आणि पदाधिकारी कायमच झटत असतात.
रत्नागिरीमध्ये सगळीकडे कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता लसीकरण मोहीम वेगाने सुरु आहे. दिव्यांग मुलांचे लसीकरण करणे हा खूप अवघड टास्क आहे. त्यांच्या मानसिकतेचा विचार करून त्याप्रमाणे कार्य करणे गरजेचे असते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नाम. उदय सामंत यांच्या सहकार्याने आविष्कार मतिमंदांच्या विकासासाठी कार्यरत संस्थेमध्ये १८ ते ४४ वयोगटातील दिव्यांगांना लसीकरण करण्यात आले.
आविष्कारचे संस्था अध्यक्ष सीए बिपीन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोरोना निर्बंधित लसीचा दिव्यांग विद्यार्थ्यांना पहिला डोस देण्यात आला. रत्नागिरी परिसरातील एकूण ९७ दिव्यांग आणि ८७ पालक व कर्मचारी असे मिळून एकूण १८४ जणांचे लसीकरण आविष्कार संस्थेमध्ये करण्यात आले. विद्यार्थ्यांचे लसीकरण त्यांच्या कलेने घेऊन, त्यांचा विश्वास संपादन करून करण्यात आले. या लसीकरणासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी तसेच या विद्यार्थ्यांवर विशेष मेहनत घेणारे डॉ. स्वप्नल साळवी (वैद्यकीय अधिकारी हातखंबा) तसेच ए.एन.एम. सहकारी सुप्रिया शिंदे, स्नेहल नागले आणि मंगल ठीक यांचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे कै.अभ्यंकर मुकबधीर विद्यालय कर्मचारी, आशादीप संस्थेचे पालक आणि आविष्कार संस्थेच्या कर्मचाऱ्याच्या सहकार्यामुळे हे लसीकरण यशस्वीपणे पार पडले.