तालुक्यातील टेरव येथे कोट्यवधी रुपयाची जलजीवन मिशन योजनेतून नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील कामे एमबी रेकॉर्डनुसार झालेली नाहीत. दाखवलेल्या आणि केलेल्या कामात तफावत असून, संबंधित ठेकेदारास २१ लाखाचे बिल आदा करून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे या योजनेतील कामाची लेखी माहिती मिळण्यासाठी टेरव तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ माळी व सहकारी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर उपोषण छेडले. टेरव येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामावरून गेल्या तीन महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धुमशान सुरू आहे.
एकनाथ माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी योजनेच्या साठवण टाकीच्या जागेवर आक्षेप घेतल्याने या कामास स्थगिती मिळाली. दरम्यान, पाणी योजनेचे काम बंद राहिल्याने ग्रामपंचायत सत्ताधाऱ्यांनी शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या साथीने पंचायत समितीवर धडक दिली. त्यानंतर पाणी योजनेच्या साठवण टाकीच्या जागेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यानंतर स्थगिती उठवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले होते. यावरून काही दिवस गावातील राजकीय वातावरण शांत होते. दरम्यान, सोमवारी एकनाथ माळी यांच्यासह ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर उपोषण केले. गेले दोन महिने पाणी योजनेची माहिती मागूनही मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेतील एमबी रेकॉर्डप्रमाणे केलेल्या कामांची फोटोग्राफी मिळावी. योजनेसाठी वापरण्यात आलेले पाईप साईजवार एक मीटरचे तुकडे मिळावेत.
जलजीवन मिशन योजनेसाठी खरेदी केलेल्या वस्तूंच्या पावत्या मिळाव्यात. योजनेचे काम चालू करताना लावण्यात आलेल्या कामाच्या अंदाजपत्रकाची प्रत मिळावी. त्याशिवाय योजनेच्या कामात दाखविण्यात आलेले काम आणि प्रत्यक्षात झालेल्या कामात तफावत आहे, तरीही संबंधित ठेकेदाराला २१ लाखांचे बिल आदा करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. गावातील १४ विषयावर ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. त्याचाही चौकशी अहवाल अद्याप मिळाला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले. शेवटी उपोषणकर्ते आणि गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, विस्तार अधिकारी व पाणीपुरवठा अभियंत्याची चर्चा झाली. एक-दोन दिवसांत आवश्यक सर्व माहिती आणि अहवाल देण्याचे आश्वासन दिले.