25.8 C
Ratnagiri
Sunday, December 22, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRajapurराजापूर सायबाच्या धरणाने घेतला मोकळा श्वास

राजापूर सायबाच्या धरणाने घेतला मोकळा श्वास

राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या मोठ्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला होता. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा शहरवासीयांना बारमाही होत नाही. महसूल विभाग, नगरपालिका आणि नाम फाउंडेशन यांच्या सहकार्याने लोकसहभागातून गाळाचा उपसा झाला. त्यामुळे गाळात रुतलेल्या सायबाच्या धरणाने मोकळा श्वास घेतला. आता धरणात सध्याच्या तुलनेत २० ते २५ पट पाणीसाठा होऊ शकतो. मुबलक साठ्यामुळे राजापूर शहराला भेडसावत असलेली एप्रिल-मे महिन्यातील तीव्र पाणीटंचाई कायमस्वरूपी सुटणार आहे.

पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्रोत – राजापूरच्या वास्तव्याच्या काळामध्ये ब्रिटिशांनी दूरदर्शीपणा डोळ्यांसमोर ठेवून राजापूर शहराला बाणीपुरवठा करण्यासाठी १८७८ मध्ये सायबाच्या धरणाची उभारणी केली. या धरणातून फारसा कोणताही वर्च न करता नैसर्गिकरीत्या पाइपलाइनद्वारे गेल्या मारे १४५ वर्षांपासून शहराला पाणीपुरवठा केला आहे. शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या णातून पाणीपुरवठा करण्यासाठी विजेचा वापर करावा गत नाही. त्यामुळे वीज वापरावर करावा लागणारा रुपयांचा बोजा नगरपालिकेवर आपसूकच पडत नाही.

गाळामुळे साठ्यावर मर्यादा – वर्षानुवर्षे पाण्यासोबत वाहत येऊन धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झालेला आहे. त्याचवेळी पाणी अडवण्यासाठी नदीपात्रामध्ये बांधण्यात आलेली भिंत जीर्ण झाल्याने धरणाला ठिकठिकाणी गळती लागलेली होती. त्यातून धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा होतो. त्याचा प्रतिकूल परिणाम होताना शहराला एप्रिल-मे महिन्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. एप्रिल-मे महिन्यातील ही पाणीटंचाईची समस्या गेल्या कित्येक वर्षापासून राजापूरची नित्याचीच बनलेली होती. त्यावर मात करण्यासाठी धरणातील गाळ उपसा करायचा झाल्यास त्याला लाखो रुपयांच्या निधीची उभारणी करणे गरजेचे होते. त्या दृष्टीनेही नगरपालिका आणि त्या त्या कालावधीतील लोकप्रतिनिधींनी प्रयत्नही केले. मात्र, त्यांना म्हणावे तितकेसे यश आलेले नाही. त्यामुळे धरणातील गाळ उपशाचा प्रश्न प्रलंबित राहिलेला होता.

धरणाच्या येथे नवे धरण – राजापूरची वर्षानुवर्षाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यशासनाकडे नव्या धरणाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार फडणवीस यांनी सुमारे १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून सायबाच्या सद्यःस्थितीतील धरणाच्या येथे नव्या धरणाची उभारणी केली जात आहे. माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या धरणाचे सुरू झालेले बांधकाम सध्या अंतिम टप्प्याकडे आहे. नव्या धरणामध्ये होणाऱ्या मुबलक पाणीसाठ्यातून भविष्यामध्ये शहरातील पाण्याची क्षमता अधिक मजबूत होणार आहे. सुदृढ होणारी पाणीक्षमता राजापूर शहराचे भविष्यातील विस्तारीकरण अन् विकासाला अधिक गतिदायक आणि दिशादर्शक ठरणार आहे.

गाळ रोखण्यासाठीही उपाय – कोदवली नदीपात्रामध्ये बांधलेल्या सायबाच्या धरणाच्या वरच्या बाजूने पाण्यासोबत वाहून येणारा गाळ, माती आणि कचरा थांबवण्यासाठी यापूर्वी कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. त्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारी माती, गाळ आणि कचरा धरणामध्ये येऊन साठत होता. भविष्यातील ही समस्या दूर करण्याचे मात्र आता नियोजन केले आहे. त्यामध्ये धरणाच्या जुन्या बांधकामापासून वरती सुमारे ७०० मीटरच्या परिसरामध्ये तीन ते चार ठिकाणी मातीचे नैसर्गिक बंधारे ठेवले आहेत. ज्यामुळे पाण्यासोबत वाहत येणारी माती, गाळ वा कचरा या बंधाऱ्यांच्या ठिकाणी अडणार आहे. त्यातून, पूर्वीप्रमाणे थेट धरणामध्ये गाळाचा होणारा संचय टळणार आहे. छोट्या-छोट्या या मातीच्या बंधाऱ्यांमध्ये गाळ संचय झाल्यास भविष्यामध्ये त्या-त्या टप्प्यातील गाळ उपसा करणे सोयीचे अन् सुलभ होणार आहे. माती, कचरा रोखण्यासाठी नैसर्गिक मातीचे बंधारे ठेवताना दुसऱ्या बाजूला एका बंधाऱ्यातील पाणी पुढच्या भागामध्ये सहज वाहून जाईल, याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नामचा पुढाकार; लोकांचा सहभाग – नव्या धरणामुळे मुबलक पाणीसाठा होणार असला तरी धरणामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ पाणीसाठा होण्यामध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे धरणाचे बांधकाम होत असले तरी त्याच्या जोडीने गाळ उपसाही होणे गरजेचे होते. त्या दृष्टिकोनातून शहरातील नद्यांमधील गाळ उपशाला सहकार्याचा हात देणाऱ्या नाम फाउंडेशनने धरणातील गाळ उपशासाठीही यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. महसूल विभाग आणि नगरपालिका यांनी राबवलेल्या या गाळ उपशाच्या उपक्रमाला लोकसहभागाची साथ मिळून संकलित झालेल्या निधीतून सुमारे दीड-दोन महिन्यांपासून गाळ उपशाचे काम सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमामध्ये लोकसहभागाच्या जोडीने प्रांताधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह सहकारी कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय चौकटीबाहेरच्या योगदानाचीही भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

वीस-पंचवीस पट पाणीसाठा – सायबाच्या धरणासह परिसरातील नदीपात्रातील सुमारे ७०० मीटर लांब परिसरातील सुमारे १ लाख ७० हजार क्युबिक घनमीटर गाळाचा उपसा झाला आहे. त्याचवेळी नदीपात्राची सुमारे ४० मीटररुंदी आणिसुमारे १५ ते २० फूटखोलीही वाढली आहे. नदीपात्रातील नैसर्गिक झऱ्यांचेही प्रमाण वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. सद्यःस्थितीतील पाण्याच्या सुमारे २०-२५ पट पाणीसाठा भविष्यामध्ये होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. धरणातील गाळ उपशामुळे नव्या सायबाच्या धरणामध्ये होणारा मुबलक पाणीसाठा भविष्यामध्ये शहराला बारमाही पाणीपुरवठा होण्यास आणि एप्रिल-मे महिन्यातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर होण्यास एकप्रकारे मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular