रिक्षात बसलेल्या प्रवासी तरूणीला आपल्या -जाळ्यात ओढू पाहणाऱ्या चालकाला प्रवासी कॉलेज तरूणीने चांगलाच धडा शिकवला. अश्लिल संवाद साधणाऱ्या या रिक्षाचालकाच्या वर्तनाबाबत तिने सोशलमिडीयावर पोस्ट व्हायरल केली. पोलिसांनीही त्याची गंभीर दखल घेतली. अवघ्या तासाभरातच पोलिसांनी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याला वाचा फोडणाऱ्या तरूणीचे कौतुक होत आहे. शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरूणी किंवा नोकरदार महिलावर्गांला प्रवासात अनेक वाईट अनुभव येत असतात. आपल्याला रोज प्रवास करायचा आहे उगाच वाद नको म्हणून अनेकदा महिलावर्ग अशा घटनांकडे दुर्लक्ष करतो. यामुळे विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांचे अधिकच फावते.
असाच काहीसा उतरून गेल्यावर प्रवासी तरूणीशी अश्लिल संवाद साधून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र तरूणीने दाद दिली नाही. घरी गेल्यावर तिने सोशलमिडीयावर एक पोस्ट करत हा प्रकार उघडकीस आणला.कॉलेज तरूणी घरी जाण्यासाठी जयस्तंभ येथे उभी होती. शेअर रिक्षात बसून ती निघाली. सोबत अन्य एक महिला होती. महिलेचा स्टॉप येताच ती उतरून गेली. त्यानंतर रिक्षात तरूणी एकटीच होती. हीच संधी साधते रिक्षावाल्याने विचारपूस सुरू केली. कोणत्या कॉलेजला आहेस, कितवीत शिकत आहेत अशी विचारणा केली आणि अचानकपणे अश्लिल संवाद साधण्यास सुरूवात केली. तरूणीने कोणताच प्रतिसाद दिला नाही. ती पार घाबरून गेली होती.
आपला स्टॉप उतरताच ती निघून गेली. पुढे काय होईल हे रिक्षाचालकाच्या ध्यानीमनीही नव्हते. तरूणीने सोशलमिडीयावर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली. पोलिसांनीही तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. तिच्या कुटुंबियांनी तसेच मित्रपरिवाराने तिला साथ दिली. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तातडीने रिक्षा चालकाला पकडण्यासाठी २ पथके स्थापन करण्यात आली. यासाठी तांत्रिक मदत घेतली गेली. रिक्षाचालकाचे लाईव्ह लोकेशन ट्रेस करण्यात आले. अवघ्या तासाभरातच या रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
अविनाश म्हात्रे असे जेरबंद करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात भा.दं. वि.कलम ३५४, ३५४ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. रिक्षाचालकाला धडा शिकवणाऱ्या तरूणीचे कौतुक केले जात आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणाची गांभिर्याने आणि तितक्याच तातडीने दखल घेणाऱ्या पोलिसांचेही कौतुक होत आहे.