येथील वाशिष्ठी डेअरीने आता पश्चिम महाराष्ट्रातूनही दूध संकलन सुरू केले आहे. बुधवारी (ता. १४) कराड तालुक्यातील मुंढे येथे वाशिष्ठी डेअरीच्या दूध संकलन केंद्राचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्सने अल्पावधीतच रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात विस्तार करण्यास सुरवात केली. दर्जेदार दुधाच्या उत्पादनासह पनीर, ताक, लस्सी, दही, श्रीखंड, आम्रखंड, तूप, पेढा आदी दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत.
चिपळूण, दापोली, मंडणगड, खेड, गुहागर, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून त्या त्या ठिकाणच्या संकलन केंद्रांद्वारे दुधाचे संकलन केले जात आहे. या केंद्रांना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच वाशिष्ठी डेअरीने पश्चिम महाराष्ट्रातूनही दूध संकलन सुरू करण्याच्यादृष्टीने पाऊल टाकले आहे. कराड तालुक्यातील मुंढे येथे या वाशिष्ठी डेअरीचे दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी या केंद्राचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उद्घाटन झाले. मुंढे परिसरातील शेतकऱ्यांना या दूध संकलन केंद्राचा मोठा फायदा होईल, असा विश्वास स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
संचालक प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरी शेतकऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करेल, असे आश्वासन दिले. या वेळी डॉ. अमोल देसाई, सागर देसाई, सरव्यवस्थापक लक्ष्मण खरात, व्यवस्थापक प्रदीप मगदूम, गुणप्रत नियंत्रण अधिकारी सुशीलकुमार कुलकर्णी, अजित बाबर, संकल्प सुतार, मुकेश कडाले, लेखा व्यवस्थापक विठ्ठल धामणकर आदी उपस्थित होते.