31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeKhedखेड खाडीपट्ट्यात विजेचे खांब जमीनदोस्त

खेड खाडीपट्ट्यात विजेचे खांब जमीनदोस्त

तालुक्यातील महावितरण कंपनीच्या लोटे उपविभागांतर्गत येणाऱ्या खाडीपट्टा भागातील कर्जी येथील ११ केव्हीच्या मुख्य वीजवाहिनीवरील व जंगलमय भागात असणारे विजेचे पाच खांब बुधवारी (ता. १४) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जमीनदोस्त झाले. यामुळे कर्जी मूळगाव येथील सुमारे साडेतीनशे ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांसह वीज कर्मचारी व ग्रामस्थांनी रातोरात घेतलेल्या अथक परिश्रमातून पाच नवीन वीजखांब उभे करून अवघ्या सहा तासांत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. अडीचशे मीटर अंतरावर असणारे पाच वीजखांब कोसळून पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने कर्जी, मूळगाव, सवणस आदी गावातील वाड्यांमधील सुमारे ३५० हून अधिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.

याची माहिती खेड कार्यालयाला मिळताच कार्यालयाचे विभागीय कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे, उपकार्यकारी अभियंता नीलेश नानोटे व कर्जी शाखेचे अभियंता प्रवीण राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ठेकेदार तथा विशाखा इलेक्ट्रिकचे सुरेश आखाडे यांनी तासाभरात ५ नवीन वीजखांब, वायर, रस्सी आदी यंत्रसामुग्री उपलब्ध केली. उपकार्यकारी अभियंता नीलेश नानोटे, शाखाभियंता प्रवीण राऊत यांच्यासह लाईनमन टी. टी. कांबळे, वायरमन प्रवीण तांबिटकर, शकलीन म्हैसकर, इब्राहिम, घाटगे, राजू मोहिते तसेच ५० हून अधिक स्थानिक ग्रामस्थांनी सायंकाळी जंगलमय भागात जाऊन जमीनदोस्त वीजखांब हटवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले.

कोसळणारा पाऊस, वन्यप्राण्यांचा धोका आणि पायवाटही नसणाऱ्या भागातील अंधारात वाट तयार करीत वीजखांब उभे करण्याचे आव्हान अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांपुढे होते. टॉर्च व दुचाकींच्या हेडलाईटच्या सहाय्याने कोसळलेले खांब बाजूला हटवून खोदकाम करत त्या ठिकाणी रस्सीच्या साहाय्याने नवीन खांब उभे करत ११ केव्हीची मुख्य वीजवाहिनी ओढून घेतली. या प्रयत्नांना यश येत मध्यरात्री एक वाजून १५ मिनिटांनी जोडणीचे काम पूर्ण केले. दीड वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले.

RELATED ARTICLES

Most Popular