तालुक्यातील गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील समुद्रकिनारा मागील काही दिवसांपासून पर्यटकांना बंद ठेवण्यात आला असला, तरी येथील श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या वादळामुळे समुद्रात उतरण्याला मनाई करण्यात आली. मात्र, त्याची चुकीची माहिती लोकांपर्यंत गेल्याने पर्यटकांनी गणपतीपुळेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथे स्थानिक व्यावसायिक तसेच हॉटेल ‘व्यवसायाचे नुकसान होत आहे. गेल्या आठवड्यात बिपरजॉय वादळामुळे अचानक समुद्राला आलेल्या मोठ्या लाटेने गणपतीपुळे किनारी असलेल्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही पर्यटकही जखमी झाले होते. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांना अंघोळीसाठी बंद केला होता. यामुळे पर्यटकांनी गणपतीपुळेकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका छोटे-मोठे व्यावसायिक तसेच लॉजिंग व हॉटेलिंग व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे.
जरी समुद्रकिनारा बंद असला, तरी येथील व्यवसाय व स्वयंभू श्रींचे मंदिर दर्शनासाठी खुले आहे. त्यामुळे पर्यटकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. गणपतीपुळे परिसरातील स्थानिक ग्रामस्थ तसेच स्थानिक मच्छीमारांनाही मज्जाव करण्यात आला असून, ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सुर उमटत आहेत. अनेक पर्यटक फिरण्यासाठी मालगुंड, भंडारपुळे, वरवडे, नेवरे, आरे वारे किनाऱ्याकडे वळू लागले आहेत. त्यामुळे गणपतीपुळे किनाराच का बंद केला आहे, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. याबाबत ग्रामस्थ पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे. पावसाने पाठ फिरवल्याने समुद्रही शांत आहे.त्यामुळे गणपतीपुळे किनाराही सुरक्षित असल्याचे स्थानिकांचे मत आहे.