जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सांगवीकर यांची बदली झाली. त्यानंतर रुग्णांना उपचारांसाठी बाहेर जावे लागत होते. या गंभीर स्थितीबाबत आणि रिक्त पदासंदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे ओएसडी हरिदास यांच्याबरोबर बोलणे झाले. डॉ. सांगवीकर यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पुन्हा रत्नागिरीत आणण्यात येणार आहे, तसेच भूलतज्ज्ञ, ऑर्थोपेडिक व अन्य महत्त्वाचे डॉक्टर भरती करण्यात येतील, अशी माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांची काल (ता. २१) जठार यांनी भेट घेतली. रिक्त पदांचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हा रुग्णालय हे नेहमीच फाईव्ह स्टारच असावे, असे माझे मत असल्याचे जठार म्हणाले. कारण, येथे गावागावांतून लोक येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाल्याच पाहिजेत. तो जनतेचा हक्कच आहे. आयुष्मान भारत योजनेचे कामही रत्नागिरीत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. याकरिता प्रत्येक ठिकाणी आयुष्मान भारत कार्डसाठी शिबिरे आयोजित करणार असल्याचे जठार म्हणाले.
डिजिटल इंडिया असे म्हणताना रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोबाईलची रेंज नसल्याची तक्रार होती; परंतु पुढील सहा महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात १९० ठिकाणी बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात येणार असल्याची माहिती जठार यांनी दिली. सरकारी जागेत किंवा खासगी जागेत हे टॉवर उभारले जाणार आहेत. त्याकरिता ग्रामस्थांनी मदत करावी. टॉवर झाल्यास रेंज येऊन डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होईल, असे जठार म्हणाले.