गणेशोत्सवापूर्वी “एका मार्गिकेचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन ती सुरू करण्यात येईल, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे; परंतु ही घोषणा प्रत्यक्षात उतरेल का? याबद्दल नागरिकांमध्ये शंका आहे. गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरिता काँक्रिटची एक लेन सुरू होणार आहे. त्याचवेळी महामार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेवर मात्र खड्यांचे साम्राज्य कायम आहे. ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे झाले आहे त्या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत. रस्ता वाहातुकीसाठी असुरक्षित ठरला असून, त्यात सतत निर्माण होणाऱ्या वाहतूककोंडीची भर पडत असल्याने हा महामार्ग पुन्हा जीवघेणा बनला आहे. प्रत्यक्ष महामार्गाचे काम कमी आणि कोर्टातील याचिका आणि आंदोलनेच अधिक गेली ११ वर्षे परिस्थिती होती.
दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी राज्य शासनाला या महामार्गाची आठवण व्हायची. सामाजिक कार्यकर्ते अॅड. अजय उपाध्ये यांनी रायगड जिल्हा न्यायालयात तर मुंबई-गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समितीचे ॲड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकांच्या सुनावणीवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या कामाचे वास्तव उघड झाले. रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पनवेल (पळस्पे ) ते इंदापूर या ८४ कि. मी. अंतराच्या महामार्गाचे काम ८६ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा एमएसआरडीसी व बांधकाम विभागाचा असला तरी एका मार्गिकेच्या काँक्रिटीकरणाचे काम मात्र पळस्पे ते हमरापूर (पेण) इतकेच झाले आहे.
हमरापूर ते इंदापूर या सुमारे ४० किमी अंतराचे काम झालेले नसून याच टप्प्यात मोठे खड्डे महामार्गावर आहेत. इंदापूर ते पोलादपूरदरम्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी ते परशुराम घाट टप्प्याचे ९५.२० टक्के काम झाल्याचा दावा असला तरी परशुराम घाटातील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. चिपळूण शहरातही काम सुरू आहे. परशुराम घाट ते आरवली या टप्प्याचे काम ६२ टक्के, आरवली ते कांटे टप्पा २२.०८ टक्के आणि कांटे ते वाकेड टप्प्याचे काम २४.२५ टक्के झाल्याचा दावा असला तरी सद्यस्थिती येथील महामार्ग काँक्रिटीकरणाचे काम बंद आहे.