शहरातील माळनाका येथील स्कायवॉकवर व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा विषय चांगलाच रंगला होता. शहरातील रस्ते व अन्य पायाभूत सुविधांवर पैसे खर्च करण्याऐवजी गरज नसणाऱ्या गार्डनवर वायफळ २६ लाख रुपये खर्च केला जात आहे. हे गार्डन रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयकेर त्यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली असून, स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डन रद्द केले आहे, अशी माहिती सुदेश मयेकर यांनी दिली. शहरातील माळनाका येथे शिर्के हायस्कूलची मुले आणि अन्य नागरिकांना रस्ता ओलांडताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे या भागात प्रचंड वाहतूककोंडी होऊन अपघात होते. त्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉकची मागणी होत होती.
मंत्री उदय सामंत यांनी नागरिक आणि विद्यार्थ्यांचा समस्येचा विचार करून दीड ते दोन कोटी रुपये खर्च करून स्कायवॉक बांधला. सुरुवातीला शाळकरी मुलांनी त्याचा वापर केला. परंतु कालांतराने या स्कायवॉकचा वापर हळूहळू कमी होऊ लागला आहे. त्याचा वापर व्हावा, यासाठी पालिकेने या स्कायवॉकवर व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजनमध्ये दिला होता. आकर्षक बागेमुळे विद्यार्थी किंवा नागरिक या स्कायवॉकचा वापर करतील, अशी पालिकेची धारण होती. जिल्हा नियोजनमधून याला २६ लाख रुपये मंजूर झाले; मात्र या गार्डनला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध झाला.
शहरातील खराब रस्ते, वारंवार पाईपलाईन फुटत पाणीपुरवठ्यातील असल्यामुळे अनियमितता, फूटपाथवर अतिक्रमण, बंद सिग्नल व्यवस्था, पार्किंगची समस्या आदींकडे पालिकेने दुर्लक्ष करून व्हर्टिकल गार्डन उभारण्याला अनेकांनी विरोध केला. याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी या गार्डनला विरोध करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या संकल्पनेला होणारा विरोध लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी स्कायवॉकवरील व्हर्टिकल गार्डन रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे सुदेश मयेकर यांनी सांगितले.