अँटी करप्शन युनिटच्या पथकातील वरिष्ठ अधिकारी असल्याचा बहाणा करून रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टरचे भरदिवसा अपहरण करून त्यांच्याकडून १० लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाशी (ता. करवीर) येथील म्होरक्यासह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दवाखान्यात बेकायदा गर्भलिंग चाचणी करीत असल्याची आपल्याविरुद्ध तक्रार असल्याचे खोटे सांगून टोळीने संबंधित डॉक्टरना ब्लॅकमेल केल्याचेही पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.
शाहूपुरी पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार मुख्य संशयित रवींद्र आबासाहेब पाटील (वय ४२, रा. पाटाकडील गल्ली, वाशी, ता. करवीर), सुयोग सुरेश कार्वेकर (३८, सावकार गल्ली, इंद्रायणीनगरजवळ, मोरेवाडी, करवीर) व सुमीत विष्णू घोडके (३३, रा. प्रगतीनगर, पाचगाव, करवीर) ता. अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. डॉ. सुभाष अण्णाप्पा डाक (५५, रा. कणेरी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या निर्देशांनुसार, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्यासह पथकाने कसबा बावडा रोडवरील पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात सापळा रचून डॉ. डाक यांची सुखरूप सुटका करून संशयितांच्या मुसक्या आवळल्या.
गुन्ह्यात वापरलेली आलिशान मोटार, पोलिसांची निळी गोल कॅम, भारत सरकार व गव्हन्मेंट ऑफ इंडिया अशी अक्षरे असलेली पाटीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, डॉ. डाक यांचा कणेरी (ता. राजापूर) येथील घरमालक सुनिल खडके यांच्या खोलीत १९९७ पासून दवाखाना सुरू आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ११.३० वाजता रुग्णालयासमोर थांबलेल्या मोटारीतून तीन अनोळखी व्यक्ती आल्या. आम्ही कोल्हापूर व नवीदिल्ली येथील अॅन्टी – करप्शनमधून आलो आहोत, असे सांगून त्यांनी वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र व लायसेन्स दाखविण्यास बजावले.. कोल्हापूर येथील एका व्यक्तीने आपणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे तुम्हाला कोल्हापूर येथील कार्यालयात यावे लागेल, असे सांगण्यात आले.
संशयितानी त्यांना मोटारीत बसविले. संबंधित मोटार राजापूर पोलिस ठाण्याला न देता परस्पर मुंबई- गोवा महामार्गावरून नेण्यात आली. डॉ. डाक यांनी संशयितांना उद्देशून कोणत्या कारणासाठी आपण मला कोठे नेत आहात, अशी विचारणा केली असता, त्यापैकी एकाने तुम्ही बेकायदा गर्भलिंग चाचणी करून महिन्याला १० लाख रुपये कमावता आहात. आमचे कोल्हापूर व नवी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक असून तुमच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करणार असल्याचे डॉक्टरना सांगण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार सापळा रचून आरोपींना पकडण्यात आले.