तालुक्यातील लोटेमाळ व बोरघर येथे गावठी हातभट्टीच्या दारू धंद्यावर धाडी टाकून येथील पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी ५ जणांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये २ महिलांचाही समावेश आहे. लोटेमाळ येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूसह विदेशी मद्याची विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच येथील पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत १ लाख २९ हजार ३३२ रुपयांच्या गावठी हातभट्टीच्या दारूसह विदेशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी सनी संजय नलावडे याच्यासह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचारी विनय पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.
लोटेमाळ येथील सनी नलावडे याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या उघड्या शेडमध्ये १९ हजार ४७८ रुपये किंमतीचा गावठी हातभट्टीची दारु व विदेशी मद्यसाठा रविवारी सायंकाळच्या सुमारास टाकलेल्या धाडीत आढळून आला. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील बोरघर येथे घराच्या मागील पडवीत बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारुची विक्री करताना अविनाश नारायण चव्हाण यास येथील पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३०० रुपये किंमतीची ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारु अड्डड्यांसह मटका जुगार अड्डयावर धाडी टाकण्याचे पोलिसांकडून सत्र सुरुच आहे.