22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurराजापुरात महामार्गावर थरार! मध्यरात्री फायरिंग करत दारूची तस्करी

राजापुरात महामार्गावर थरार! मध्यरात्री फायरिंग करत दारूची तस्करी

दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक व गोळीबार करणारे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून दारू वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर मागून दोन चारचाकी वाहनातून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने पोलिसांना कारवाई करण्यास अटकाव करत गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार करणारे दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला घेवून पळून गेले. दरम्यान दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक व गोळीबार करणारे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित चालक व त्याचा एक साथीदार याला बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक सतिश इंगळे यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.

टिप मिळाली – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला एक टिप मि ळाली होती. मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच मुंबईतून एक पथक रत्नागिरीच्या दिशेने रवाना झाले होते. लांजा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेऊन हे पथक संशयितांच्या मागावर होते.

सापळा लावला – जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे राज्य भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे सापळा रचला होता. मंगळवारी रात्री १ वाजल्यापासून कर्मचारी त्या ठिकाणी दबा धरून बसले होते. ज्या वाहनातून तस्करी होणार होती त्या वाहनाच्या प्रतिक्षेत हे कर्मचारी होते.

ट्रक अडवला – पोलिसांनी पत्रकारांना याबाबत दिलेल्या अधिक माहितीनुसार, राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे सापळा रचल्यानंतर मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास संशयित ट्रक सम रून येताना दिसल्याने भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ते वाहन थांबवले. यावेळी वाहन चालक महावीर भोसले व त्याच्यासोबत ज्ञानेश्वर उन्हाळे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) या दोघांची त्यांनी चौकशी केली असता गोव्यावरून अवैध मद्यसाठा भरून सोलापूरला घेवून जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बापू भोसले टीमसह पोहोचला – दरम्यान या वाहनाची चौकशी सुरू असताना १० मिनिटानंतर गोव्याकडून अचानकपणे स्विफ्ट व फॉर्म्युनर अशा दोन गाड्या त्या ठिकाणी येवून थांबल्या. या गाड्यांमधून ८ जणांचे टोळके खाली उतरले. यापैकी एक इसम हा सोमनाथ उर्फ प्रशांत उर्फ बापू तुकाराम भोसले (रा. खवणी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) तर दुसरा त्याचा चुलत भाऊ शेखर भोसले हा होता, असे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. बापू भोसले व त्याच्या साथीदारांवर याआधी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये १० पेक्षा जास्त गुन्हे नोंद असल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

माझी गाडी सोडा – मोठ्या आवेशात गाडीतून खाली उतरताच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, ‘माझी गाडी सोडा, आजवर माझ्या भरपूर गाड्या तुम्ही पकडल्या आहेत. माझ्या व्यवसायाचे तुम्ही नुकसान केले आहे. आता ही गाडी तुम्हाला मी नेऊ ‘देणार नाही’ अशा शब्दात या मंडळींनी जणूकाही दमच दिला.

फायरिंग केले – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना धमकावत असताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर एकजण धावून गेला व त्याच दरम्यान त्याने आपल्या कमरेला असलेले पिस्तुल काढून हवेत गोळीबार केला. यावेळी त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला.

दुसऱ्यांदा फायरिंग – हवेत गोळीबार केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने पुन्हा हवेत गोळीबार केला आणि ट्रक चालक व त्याच्या साथीदाराला आपल्या स्विफ्ट गाडीमध्ये घेऊन तो घटनास्थळावरून पसार झाला.

राजापूर पोलिसांशी संपर्क – या कारवाईत लांजा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या टिमची मदत घेण्यात आली होती. ही टिम घटनास्थळी दाखल होताच या मंडळींनी पलायन केले. भरारी पथकाने राजापूर पोलिसांशी संपर्क साधून जादा कुमक मागवून घेतली.

सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क – राजापूर तालुक्यातील कोंड्ये तर्फे सौंदळ येथे हवेत गोळीबार करून सिंधुदुर्गच्या दिशेने संशयित पळाल्यानंतर राजापूर पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधला व सर्व माहिती त्यांना दिली. ही माहिती मिळताच सावंतवाडी पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली.

स्विफ्ट गाडी अडवली – सावंतवाडी पोलिसांनी नाकाबंदी ‍ केली असताना आंबोली पोलीस सुरू स्थानकाचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी सुरू झाली. सकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सावंतवाडीच्या दिशेने एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी येताना दिसली आणि पसार झालेले संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडले.

तिघांच्या मुसक्या आवळल्या – आंबोली पोलीस पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दिपक शिंदे, पोलीस नाईक मनिष शिंदे, होमगार्ड चंद्रकांत जंगले आदींनी ती स्विफ्ट गाडी अडवून गाडीतील व्यक्तींची चौकशी केली असता मिळालेल्या वर्णनाच्या व्यक्ती गाडीमध्ये होत्या. त्यांनी तात्काळ गाडीतील प्रवीण परमेश्वर पवार (२५, रा. तांबडे, ता. म होळ, जिल्हा सोलापूर), शेखर नेताजी भोसले (२५, रा. खवणे, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर) व प्रेमकुमार जेटीराम चौधरी (२३, रा. गुडामलानी, वाडनेर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि राजापूर पथकाच्या ताब्यात दिले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गुन्हा दाखल – दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला मुद्देमाल ताब्यात घेतला असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे तर अवैध दारूची वाहतूक रोखत असताना सोमनाथ उर्फ प्रशांत उर्फ बापू तुकाराम भोसले याने त्याच्या ताब्यातील पिस्तुल बाहेर काढून आत्महत्या करण्याची धमकी देवून तसेच हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करून व त्याच्यासोबत असणाऱ्या इतर १० लोकांच्या मदतीने शासकीय कामात अडथळा आणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात असणाऱ्या वाहन चालक महावीर भोसले व त्याचेसोबत असलेला ज्ञानेश्वर उन्हाळे यांच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार करून त्यांची अवैधपणे सुटका करवून पळून गेल्याने संशयित आरोपी म्हणून बापू भोसले, शेखर भोसले व त्यांचेसोबत असणाऱ्या अन्य साथिदारांविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular