25.6 C
Ratnagiri
Thursday, September 19, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeRatnagiriजिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजाला दिलासा

जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, बळीराजाला दिलासा

पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. उन्हाच्या तडाख्यामुळे होरपळलेली भातशेती दिवसभर पडलेल्या पावसाने तरारेल, अशी आशा आहे. भातशिवारात पाणी साचले आहे. उन्हामुळे भात करपण्याची बळीराजाची चिंता दूर झाली. पावसासोबत वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळल्याने मासेमारी ठप्प झाली आहे. जयगड येथे परजिल्ह्यातील मच्छीमारी नौका दाखल झाल्या आहेत. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही परिस्थिती तशीच. गुरुवारी सायंकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हलके वारे समुद्रकिनारी भागात वाहत होते. रात्री हलका पाऊसही पडून गेला; परंतु त्यात जोर नव्हता; मात्र शुक्रवारी पहाटेपासून वेगवान वाऱ्यासह जोरदार सरी कोसळू लागल्या. हा पाऊस सर्वत्र झाला आहे. मागील सुमारे दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर जिल्ह्यात शुक्रवारी दोन अंकी सरासरी पाऊस नोंदला गेला. शहरात मारुती मंदिर, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, जेलनाका, जयस्तंभ परिसरात रस्त्यावर पाणीच पाणी होते.

या पावसामुळे हवेतही गारवा निर्माण झाला. उन्हाच्या कडाक्यामुळे गर्मीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दुपारपर्यंत संततधार सुरू होती. त्यानंतर विश्रांती घेतली; पण ढगाळ वातावरण होते. पाऊस सर्वत्र पडल्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढू लागली, तर धबधबेही प्रवाहित झाले होते. पावसाअभावी ग्रामीण शेतकऱ्यांचे गणित बदलून गेले असतानाच आज पडलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. हा पाऊस असाच चार दिवस तरी पडत राहावा, अशी आशा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी (ता. ८) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत सरासरी ३८.६७ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यात मंडगणड ५०, दापोली ७५, खेड २६, गुहागर ६८, चिपळूण ४०, संगमेश्वर ८, रत्नागिरी २३, लांजा ३३, राजापूर २५ मिलिमीटर नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी २६२१ मिलिमीटरची नोंद झाली आहे; परंतु गतवर्षी याच कालावधीत ३०५५ मिलिमीटर सरासरी पाऊस झाला होता. ४०० मिलिमीटरची तफावत अजूनही दिसत आहे.

मासेमारीला ब्रेक – पावसाबरोबर वेगवान वारे वाहत असल्यामुळे मासेमारीला ब्रेक लागला आहे. मुंबईसह परजिल्ह्यातील काही मच्छीमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी जयगड बंदरात आसरा घेतला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील काही नौकाही येथे आल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular