मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गेली १३ वर्षे रखडलेला असताना मिऱ्या नागपूर या रत्नागिरी शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम वेगाने आणि युद्धपातळीवर सुरू आहे. परटवणे ते साळवी स्टॉप भागात रस्त्याच्या एका बाजूचे सपाटीकरण पूर्ण होत आले आहे. रवी इन्फ्रा कंपनीकडून हे काम सुरू आहे. मिऱ्या – नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत ठेकेदार कंपनीकडून हे काम वेगाने सुरू आहे. रत्नागिरी, कुवारबाव, खेडशी, हातखंबा, पालीपासून पुढे साखरपापर्यंतच भूसंपादन रत्नागिरी प्रांताधिकाऱ्यांकडे आहे.
भूसंपादनाची बहुतेक प्रक्रिया पूर्ण झाली असून, कुवारबाव व अन्य काही गावांमध्ये फ्लायओव्हर की बायपास काढायचा यावरून मतमतांतरे आहेत. त्यामुळे काही ठिकाणी भूसंपादनाचे पैसे वाटप झालेले नाहीत; परंतु ज्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मोबदला दिलेल्या साखरपा ते पालीपर्यंत चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. वेगाने काम झाल्याने मुंबई-गोवा महामार्गापूर्वी मिऱ्या-नागपूर रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी अनेकांची अपेक्षा आहे. मिऱ्यापासून या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. सध्या परटवणे येथून कामाला वेगाने सुरुवात झाली आहे.
चौपदरीकरणासाठी ठेकेदार कंपनीने एका बाजूने रस्त्यालगत सपाटीकरण केले आहे. एक बाजू जवळ जवळ सपाटीकरणाचे काम पूर्ण होत आले आहे. फिनोलेक्स कॉलनीपासून नर्मदा सिमेट, चंपक मैदान ते साळवी स्टॉपपर्यंत रवी इन्फ्रा कंपनीने चौपदरीकरणाच्या कामाला गती दिली आहे.काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकामांचा विषय आहे त्यावरही लवकरच तोडगा निघणार आहे. रस्त्यात येणारी अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली जात आहेत.