महावितरण कंपनीच्या खेड, दापोली व मंडणगड तालुक्यातील तीन वर्षांच्या आतील वीज बिले थकीत असलेल्या ५२२ ग्राहकांपैकी केवळ १५ जणांनीच लोकअदालतीत उपस्थिती दर्शवली. सर्वाधिक ग्राहक संख्येसह थकीत रकमेच्या लोटे विभागातील वीज ग्राहकांनी लोकअदालतीकडे पाठ फिरवल्याचे यावरून स्पष्ट होते. महावितरणची केवळ ७ प्रकरणे तडजोडीने निकाली काढून २८ हजार ११० रुपये वसूल करण्यात आले. येथील न्यायालयात झालेल्या लोकअदालतीत १०९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या लोकअदालतीसाठी दिवाणी न्यायालयाकडून महावितरण कंपनीशी निगडित १ व २, खेड, लोटे व मंडणगड या पाच विभागांतील तीन वर्षांच्या आतील ग्राहकांची सर्वाधिक बिले थकीत असलेली प्रकरणे ठेवण्यात आली होती.
वीजबिले थकवून मीटर कायमस्वरूपी बंद केलेल्या ५२२ ग्राहकांकडे ५९ लाख ५९ हजार ५७८ रुपयांची रक्कम थकीत आहेत. थकीत ग्राहकांची प्रकरणे न्यायालयात दाखल असल्याची बाब लोकअदालतीत समोर आली. दिवाणी न्यायालयात दाखल प्रकरणांमध्ये दापोली १ मधील ५० थकीत वीज ग्राहकांचा समावेश असून त्यांच्याकडे ७,७०,१२० रूपये, दापोली २ मधील ४९ ग्राहकांकडे ८, ७४,६७० रूपये तर खेडमधील १५४ ग्राहकांकडे १४,३१,८५० रुपये, लोटेतील २०१ ग्राहकांकडे २४,१३,७१२ रूपये तर मंडणगडमध्ये ६८ ग्राहकांकडे ५,३२,२२६ रूपये थकित आहेत.
दापोली २ मधील ४ ग्राहकांनी लोकअदालतीत हजेरी लावली. त्यातील केवळ एका ग्राहकाने ३,५७० रूपयांची थकित रक्कम भरणा केली. खेडमधील ५५ जणांनी १८ हजार ५४० रूपयांची थकबाकी भरली. मंडणगडातील एका थकित ग्राहकाने उपस्थित न राहताच तडजोडीचा मार्ग स्वीकारत ६ हजार रूपये जमा केले. दापोली १ मधील सात ग्राहकांनी उपस्थित राहूनही थकित भरणा करण्यास असमर्थताच दर्शवली. लोटे विभाग औद्योगिक क्षेत्रात २०१ ग्राहकांची २४ लाख १३ हजाराहून अधिक रक्कम थकित आहेत. ही थकित रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महावितरणसमोर उभे ठाकले आहे.