खेड शहरात डेंगी साथीने पुन्हा डोके वर काढल्यामुळे नागरिकांची धास्ती वाढली आहे. डेंगीच्या वाढत्या फैलावानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. थंडावलेली घराघरातील (“डोअर टू डोअर”) सर्वेक्षणाची मोहीम पुन्हा हाती घेण्यात आली आहे. सहा कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा सर्वेक्षण सुरू असून, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यात येत आहे. आतापर्यंत १६९ डेंगीसदृश रुग्ण आढळले असून, त्यातील १६६ जण बरे झाल्याची आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सद्यःस्थितीत ३ रुग्णच सक्रिय असल्याचेही सांगण्यात आले. ऑगस्ट महिन्यात डेंगीच्या साथीने अक्षरश: थैमानच घातले होते.
दिवसागणिक वाढणाऱ्या डेंगीसदृश रुग्णांमुळे नागरिक पुरते हतबलच झाले होते. साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्ययंत्रणांनी शर्थीचे प्रयत्न करूनही डेंगी साथीचा प्रादुर्भाव रोखण्यात यंत्रणांना अपयशच आले होते. याशिवाय अत्यावश्यक साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे यंत्रणांनीही गुडघेच टेकले होते. सततच्या पाठपुराव्यानंतर आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध झाल्यानंतर डेंगीची साथ. नियंत्रणात आणण्यासाठी यंत्रणांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने साथ आटोक्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. जुलै महिन्यात ३० ऑगस्टमध्ये ९३ व सप्टेंबरमध्ये ४२ डेंगीसदृश रुग्ण आढळले होते.
हे सर्व रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात आले तर गेल्या ८ दिवसात ९ जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यातील तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र, बहुतांश डेंगीसदृश रुग्ण शासकीय रुग्णालयांपैकी खासगी दवाखान्यांमध्येच उपचार करणे पसंत करत असल्याने डेंगीसदृश रुग्णांचा नेमका आकडा अजूनही समोर आलेला नाही. खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह लॅबोरेटरीधारकांना डेंगीसदृश रुग्णांबाबत माहिती देणे बंधनकारक असतानाही त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचा सूर आळवला जात आहे. आरोग्ययंत्रणांनीही सद्यःस्थितीत ही बाब फारशी गांभीर्याने न घेतल्यामुळेच फैलाव दिवसागणिक वाढत आहे.