चिपळूण शहरातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. बहादूरशेखनाका ते पॉवरहाऊसपर्यंत उड्डाणपूल गरजेचा असताना हा पूल प्रांतकार्यालयापर्यंत होणार आहे. प्रांत कार्यालय ते पॉवर हाऊस दरम्यान येणाऱ्या शासकीय कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच स्थानिकांना ये-जा करणे अवघड होणार आहे. पॉवर हाऊस येथे रस्ता पार करणे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे प्रांत कार्यालयापर्यंत असलेला उड्डाणपूल कापसाळ कॉलनीपर्यंत व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बहादूरशेखनाका बाजूकडून गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या बाजूने सर्व्हिस रोड करण्यात आले आहेत. मात्र रस्ते दर्जाहीन आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. पंचायत समिती समोरून ते पॉवर हाऊस दिशेकडे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र बहादूरशेखनाका ते कापसाळ कॉलनीपर्यंत उड्डाणपूल आवश्यक असताना प्रांत कार्यालयासमोर या पुलाची समाप्ती करण्यात आली आहे. बहादूरशेखनाका ते कापसाळ कॉलनीपर्यंत उड्डाणपूल बांधला गेला असता तर पुलाखालील जागा मोकळीच राहिली असती आणि शहरांतर्गत रहदारी सुरक्षित झाली असती.
यामुळे प्रांत कार्यालय ते कापसाळ कॉलनीपर्यंत उड्डाणपूल होणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागला आहे. पोलिस ठाणे व पागमाळा येथे शहरातील रस्ता हायवेपेक्षा बराच खाली असल्याने या ठिकाणच्या चढावर सुरक्षितपणे ये-जा करणे मुश्किल झाले आहे. तसेच पॉवर हाऊस येथील चौपदरीकरणामुळे रस्ता ओलांडणे जिकरीचे बनले आहे. येथील सर्व्हिस रोड देखील पूर्ण करण्यात आलेला नाही.