रत्नागिरी रेल्वेस्टेशन आणि शहरातील जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांबे उभारण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी मनसेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी येथील रिक्षा व्यावसायिकांनी मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतली व समस्या मांडल्या होत्या. रत्नागिरीत शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही लक्षणीय असल्यामुळे रत्नागिरी रेल्वेस्टेशन व जयस्तंभ येथे शेअर रिक्षाचालकांसाठी थांबा असावा, ही मागणी पुढे करण्यात आली आहे. शेअर रिक्षासाठी अधिकृत जागाच नसल्याने रिक्षाचालकांना अनेकवेळा दंडात्मक कारवाईसह नियमित रिक्षाचालकांच्या दादागिरीला सामोरे जावे लागते.
काही दिवसांपूर्वीच नियमित रिक्षाचालकांकडून रेल्वेस्थानक परिसरात शेअर रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. भाडे मिळवण्यासाठी रिक्षा व्यावसायिकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. रेल्वेस्थानक परिसरात रात्री उशिरा एसटी गाड्यांची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांची गैरसोय होते. अशावेळी रिक्षाचा उपयोग होतो. एका प्रवाशाला रिक्षा करून जाणे परवडत नाही. त्यामुळे प्रवाशांनाही भुर्दंड बसतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी सोमवारी (ता. १६) मनसेतर्फे हे आरटीओंना निवेदन देण्यात आले. तेथे झालेल्या चर्चेत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
तसेच रेल्वेस्टेशन परिसरात शेअर रिक्षाचालकाला झालेल्या मारहाणीसंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत चर्चा करण्यात आली. या वेळी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, शहर सचिव अजिंक्य केसरकर, विभाग अध्यक्ष सर्वेश जाधव, मनविसे शहराध्यक्ष तेजस साळवी, अनंत शिंदे, रिक्षाचालक इमरान नेवरेकर, मोहोम्मद रिजवान, महेंद्र शिंदे, विनायक शिंदे, नितीन चेचरे, सचिन रांबाडे, वैभव बेंद्रे, प्रशांत साळुंखे, प्रणव साळुंखे, नवनाथ कुड आदी उपस्थित होते.