मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामवरील कारवाई थांबवण्यासाठी किंवा मच्छीमारांना सहकार्य करण्यासाठी कोणताही पक्ष किंवा पदाधिकारी पुढे आला नाही. येथील मच्छीमार महिलांचा रोजगार हिरावला गेला, असा आरोप करत मिरकरवाडा येथील नाराज माजी नगरसेवकांसह शिंदे गटाची तळी उचलून धरणारे अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मंडळाने पक्षाचे राजीनामे दिले. यापुढे शिवसेना पक्षातून नगरसेवक पदासाठी उभा राहणार आणि सहकार्यही केले जाणार नाही, असेही राजीनाम्यात म्हटले आहे. राजीनामा अस्त्राने शिवसेनेला चांगलाच फटका बसणार आहे.
मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत ३०३ बांधकामावर आज सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने महसूल विभाग, पालिका आणि पोलिसांच्या बंदोबस्तात हातोडा पडला. अंतिम नोटिशीची मुदत सोमवारी संपल्यानंतर आज झोपड्या, शेड, पक्की बांधकामे तोडण्यात आली. ही कारवाई थांबण्यासाठी विविध पक्षाच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले; परंतु त्याला दाद न देता ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सत्तेतील शिवसेच्या माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
या कारवाईवेळी पक्षाचा एकही पदाधिकारी मिरकरवाड्यात फिरकला नाही. कारवाई थांबविण्याच्यादृष्टीने प्रयत्न न केल्याने प्रचंड संतापाची लाट आहे. काही पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटायला गेले तरी कारवाई काही थांबली नाही. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत.