खेड नगरपालिकेच्या रुग्णालयासाठी देण्यात आलेल्या ६० लाख रुपये किंमतीच्या दोन अत्याधुनिक रुग्णवाहिका गेल्या वर्षभरापासून नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात सडवल्या जात असल्याची गंभीर बाब समोर आली असून गेल्या वर्षभरापासून या गाड्यांची पासिंग न केल्यामुळे करारावर दिलेल्या सेवाभावी संस्थांनी या गाड्या नगरपालिकेकडे जमा करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. खेड नगरपालिकेच्या रुग्णालयाला कोरोना काळात येथील सामाजिक कार्यकर्ते कौस्तुभ बुटाला यांनी बंधन बँकेच्या माध्यमातून ४० लाख रुपये किंमतीची सर्व सुविधायुक्त काडीयाक रुग्णवाहिका नंबर एमएच ०८ एपी ३३६० देण्यात आली. तर खासदार तटकरे यांच्या माध्यमातून रुपये २० लाख रुपये किंमतीची एमएच ०६ बीडब्लू ४८९५ हो गाडी देण्यात आली.
या दोन्ही गाड्या खेड नगरपालिकेने येथील रॉयल ऍम्ब्युलन्स आणि खेड तालुका मुस्लिम वेल्फेअर संघटनेला प्रत्येकी एक रुग्णवाहिका तीन वर्षाच्या भाडे तत्वावर दिल्या होत्या. या उत्पन्नातील ८० टक्के रक्कम सेवाभावी संस्थेला तर २० टक्के रकम नागरपलिकेला देण्याचे ठरले होते. मात्र भाड्याची रक्कम ही पूर्णपणे नगरपालिकेला आधी भरून नंतर सेवाभावी संस्थेला त्यांचे उत्पन्न देण्यात येत होते. या रुग्णवाहिकांच्या कागदपत्र पुर्ततेची जबाबदारी ही कराराप्रमाणे नगरपालिकेची होती. असे असताना नगरपलिकेकने गेल्या वर्षभरापासून या गाड्यांची पासिंग न केल्यामुळे करार केलेल्या संस्थांनी करार संपण्यापूर्वीच रुग्णवाहिका नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या.
पासिंग नसलेल्या गाडीमधून रुग्ण नेताना अपघात झाल्यास जबाबदार कोण? यामुळे या दोन्ही गाड्या वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात दिल्या होत्या, पावसाळ्यात पाणी भरत असल्याने गाड्या नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रात आणून ठेवण्यात आल्या मात्र कोणतीही शेड नसल्याने सदर गाड्या आता सडण्यास सुरुवात झाली आहे. याला जबाबदार असणारांवर खेड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा सवाल खेडचे जागरूक नागरिक विचारत आहेत. दरम्यान याबाबत खेडचे प्रभारी मुख्याधिकारी श्री. शिंगटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत आपणाला काही माहिती नसल्याचे सांगितले. माझ्याकडे ५ नगरपालिकेचा कारभार असल्याने आपणाला याबाबत माहिती घ्यावी लागेल असे त्यांनी सांगितले.