तालुक्यातील पर्यटनवाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्राणिसंग्रहालयाचा प्रस्ताव वेगवेगळ्या विभागाचे हेलपाटे मारताना दिसत आहे. परवानग्यांच्यादृष्टीने अनंत अडचणी येत आहेत. त्यामुळे हा प्रकल्प वनविभागाऐवजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) राबवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष प्रयत्न सुरू असून, लवकरच करार होणार आहे; परंतु तिथेही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा परिषदेमार्फत मालगुंड येथील १०० कोटींचा हा प्रकल्प करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पावर वनविभागाचेच नियंत्रण राहणार आहे.
रत्नागिरी तालुक्यात पर्यटनाला नवी उभारी मिळावी, रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उन्नत्ती होण्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे १०० कोटींचा हा प्रकल्प असून, त्यासाठी १५ हेक्टर जागा अपेक्षित आहे. आरे-वारे येथे वनविभागाच्या जागेत करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला सीआरझेडसह अनेक अडचणी आल्या होत्या. त्यामुळे मालगुंड येथे १५ हेक्टर जागा निश्चित केली. वनविभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प होणार आहे; परंतु त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळवणे अतिशय क्लिष्ट बनले. वारंवार दिल्ली दौरे करूनही त्या मिळत नव्हत्या.
मंत्री सामंत यांनी याबाबत संबंधित विभागांची बैठक घेऊन एमआयडीसीच्या माध्यमातून हा प्रकल्प कराता येईल का, याची चाचपणी केली; परंतु तांत्रिक अडचणीमुळे एमआयडीसी विभागाकडूनही हा प्रकल्प करता येत नाही. आता पर्याय म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा प्रकल्प करता येईल का, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रकल्प मोठा असून यामध्ये ४० ते ४५ जातीचे प्राणी ठेवले जाणार आहेत. तालुक्यासह जिल्ह्याच्या पर्यटनवाढीला नवा आयाम देणारा हा प्रकल्प आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर व्हावा यासाठी पालकमंत्री सामंत यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. वनविभाग आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला.