भाजपकडून इच्छुक असलेले धैर्यशील पाटील हे रायगड लोकसभेचे उमेदवार असतील, असे जणू संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. पुढील वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. युती, आघाड्यांची वाट न पाहता प्रत्येक लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे महाविजय २०२४ मोहिमेच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात आले होते. गुहागर येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ जागा आम्हाला जिंकायच्या आहेत. यापैकी एक रायगडची आहे. त्यामुळे रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे त्यांनी जाहीर केले. धैर्यशील पाटील हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या जिल्हा दौऱ्यात सामील झाले होते. त्यामुळे बावनकुळे यांच्या या दौऱ्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर हक्क सांगितला जाणे स्वाभाविक आहे. महायुतीच्या माध्यमातून खासदार सुनील तटकरे यांना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते; मात्र तरीही बावनकुळे यांनी आपल्या दौऱ्यात रायगडचा पुढील खासदार हा भाजपचाच असेल, असे जाहीर करून टाकले. भाजपच्या दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे भाजपचे उमेदवार असतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे तटकरे यांना बाजूला ठेवून भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.