उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. कधी डॉक्टर नाहीत तर कधी औषध नाही, अशी स्थिती आहे. या रुग्णालयातील अतिशय महत्त्वाची पदे रिक्त आहेत. एवढेच नव्हे तर या रुग्णालयात कोरोना कालावाधीत नव्याने सुरू केलेली ऑक्सिजन प्रकल्पासह अन्य यंत्रणा पडून आहे. त्यामुळे नांदडे जिल्हा रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर येथेही बऱ्याचशा सुधारणा करण्याची मागणी रुग्णांकडून व नातेवाइकांकडून होत आहे. या रुग्णालयात अपुरा औषधपुरवठा, अस्वच्छता, वैद्यकीय अधीक्षक, शल्यचिकित्सक, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
सहायक, अधिपरिचारिका, औषध निर्माण अधिकारी, शिपाई आदी एकूण २८ पदे अद्याप भरलेली नाहीत. भरलेल्या पदापैकी काही ठेकेदारी पद्धतीने भरली असल्याने ते कधीही सोडून जातात. त्यामुळे त्याचा फटका रुग्णांना बसतो. येथे आवश्यक कर्मचारीवर्ग, औषधपुरवठा व शस्त्रक्रियेसाठी लागणारी साधनसामग्री वेळेवर उपलब्ध होत नसल्याने उपचारासाठी विलंब होत असल्याचे प्रकारही आता पुढे येत आहेत. दोन वर्षापूर्वी कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या रुग्णालयात विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत काही यंत्रणा व कोविड सेंटर उभारले होते.
त्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे ऑक्सिजन प्रकल्प स्वतंत्रपणे उभारण्यात आला; मात्र त्यानंतर काही ठराविक अंतराच्या गॅस वाहिनीसाठी हा प्रकल्प अद्याप सुरूच झालेला नाही. उलट या ऑक्सिजन प्रकल्पाची यंत्रणा खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्याशिवाय कोविड सेंटरमध्ये २० हून अधिक अत्याधुनिक बेड उपलब्ध केले होते. ते देखील धूळखात पडले आहेत. रुग्णालयाच्या इमारतीची देखभाल दुरुस्ती वेळेत होत नसल्याने काही यंत्रणा निकामी झाल्या आहेत. शवविच्छेदन कक्षाची अवस्था दयनीय आहे.