26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiriग्रामीण भागातील आरोग्य तपासणीवर परिणाम, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

ग्रामीण भागातील आरोग्य तपासणीवर परिणाम, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू आहे.

शासकीय सेवेत समायोजन करून घ्यावे, या मागणीसाठी गेल्या आठवड्यांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे उपकेंद्रस्तरावर होणाऱ्या आरोग्य तपासणींवर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर ऑनलाईन नोंदणीचे कामही पूर्णतः ठप्प झाले आहे. सध्या डेंगीची साथ मोठ्या प्रमाणात पसरलेली असताना गावभेटी, साथींचा सर्व्हे यासारख्या कामांवर परिणाम झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेले जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यिका यांनी आरोग्यसेवेत समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले. त्यांनी मुंबईतील आझाद मैदानातही जोरदार आंदोलन केल्यामुळे प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रातील आरोग्यसेवेवर परिणाम झाले आहेत.

विशेष म्हणजे आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेले समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका या कामबंद आंदोलनात उतरल्याने तेथील आरोग्यसेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत; मात्र शासनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्र व आरोग्यकेंद्रांतील आरोग्यसेविका संपात गेल्याने ग्रामीण आरोग्ययंत्रणा विस्कळीत झाली आहे. बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेसमोर हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी मंगळवारी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला तसेच तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत पोहोचवू, असेही आश्वासन दिले.

आरोग्य विभागाची कसरत – कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये सुमारे साडेचारशेहून अधिक लोकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद उपकेंद्रस्तरावर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गावभेटी देणे, लसीकरण मोहीम जागृती करणे, साथरोगांचा सर्व्हे करणे, समुदाय आरोग्य अधिकारी, सकाळच्यावेळी उपकेंद्रात येणाऱ्या रुग्णांची तपासणी करणे, आरोग्यविषयक अहवालांची ऑनलाईन नोंदणी करणे यासारखी कामे केली जातात. हे कर्मचारी कार्यरत नसल्यामुळे सध्या रुग्ण तपासणी थंडावली आहे. यावर पर्याय म्हणून उपकेंद्रात नियमित एएनएमची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले; मात्र कायम कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे कमतरता जाणवत असून आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular