20.3 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeRatnagiriअखेर खेडमधील खूनाला वाचा फुटलीच!

अखेर खेडमधील खूनाला वाचा फुटलीच!

पोलिसांनी अवघ्या २४ तासात उघड केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील विवाहिता सौ. चैत्राली निलेश मेस्त्री (वय ३५) या तरुणीचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून सावंतवाडी पोलिसांनी या प्रकरणी तिचा चुलत दीर संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री (वय १९) याला अटक केली आहे. खून केल्यानंतर चैत्रालीने आत्महत्या केल्याचा बनाव त्याने केला. खरा पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो काही सुटला नाही. खुनाला वाचा फुटलीच, पोलिसांनी इंगा दाखवताच त्याने भावजयीचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती तपास करणारे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी पत्रकारांना दिली. संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली असून मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

अधिक वृत्त असे की, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील विवाहिता सौ. चैत्राली निलेश मेस्त्री (वय ३५) ही महिनाभरापूर्वी सावंतवाडीच्या सबनिसवाडा येथे भाड्याने जागा घेवून रहायला आली. शनिवारी (९ डिसेंबरला) चैत्रालीने आत्महत्या केल्याची खबर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पहाणी केली असता तिच्या अंगावर जबर मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या. त्याचवेळी चैत्रालीने आत्महत्या केलेली नाही तर तिला मारण्यात आले असा अंदाज पोलिसांना आला होता. पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला आणि चौकशीसाठी चैत्रालीचा चुलत दीर संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री (वय १९) याला ताब्यात घेतले.

खूनाची कबुली – रविवारी दिवसभर संशयित आरोपी संजय मेस्त्रीची पोलिसांनी चौकशी केली. तो पोलिसांना सहकार्य न करता उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांना आपला खाक्या दाखवताच त्याने आपण चैत्रालीचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

खेडमधील रहिवासी – अधिक वृत्त असे की, चैत्रालीचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील निलेश मेस्त्री या तरुणाशी झाला होता. चैत्राली-निलेश या दाम्पत्याला ३ मुले आहेत. पती निलेश मेस्त्रीला दारुचे व्यसन लागल्याने रोजच्या भांडणाला कंटाळून चैत्राली आपल्या माहेरी म्हणजेच कोथरुडला जावून राहू लागली. तिचा चुलत दीर संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री हा तेथे तिला भेटायला आला. त्याने तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. आपण गोव्याला जावू असेदेखील त्याने तिला सांगितले. मात्र त्यालादेखील दारुचे व्यसन असल्याने चैत्रालीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला.

मुलांना मारण्याची धमकी – सौ. चैत्राली आपल्यासोबत येण्यास तयार नाही हे लक्षात येताच संजय याने तिला धमकी दिली. आपल्या सोबत न आल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, असे धमकावले. तेव्हा घाबरुन चैत्राली संजय सोबत येण्यास तयार झाली. गेल्या महिन्यात गोव्यात जाण्याचे सांगत संजय तिला घेवून सावंतवाडीत आला. सावंतवाडीत खोली भाड्याने घेतली. काही दिवस सावंतवाडीत रहा अशी विनंती त्याने चैत्रालीला केली. त्यानुसार सबनिसवाडा येथे ती राहू लागली. संशयित आरोपी संजय उर्फ संदेश मेस्त्री हा एका भांड्याच्या दुकानात काम करु लागला.

चिकन, मासे खरेदी – शनिवारी (९ डिसेंबर) संजय चैत्रालीला घेवून बाजारात आला. चिकन, मासे खरेदी केले. त्यानंतर सकाळी १०.३० वा.च्या सुमारास तो कामावर निघून गेला. दुपारी १.३० वा. जेवणासाठी घरी आला. जेवण वाढण्यावरुन त्यांच्यात भांडण सुरु झाले. दोघांमध्ये शाब्दीक खटके उडाले. रागाच्याभरात संजयने चैत्रालीला मारहाण केली. तिचे  डोके भिंतीवर आपटले. त्यामुळे ती रक्तबंबाळ झाली आणि काही वेळातच जमिनीवर कोसळली. त्यानंतर आरोपी संजयने तिला फरपटत किचनमध्ये नेले. तिच्या गळ्याला ओढणी बांधली आणि घराच्या वाश्याला लटकविले. ती मेली की नाही याची खातरजमा करण्यासाठी स्टोव्ह पेटविला आणि त्यावर पाणी गरम करुन त्याचे चटके तिला दिले. ती मेल्याची खात्री होताच तिच्या खेळणाऱ्या मुलाला घरात बोलावले आणि तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, अशी सारी हकीगत पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी पत्रकारांना सांगितली. पोलिसांना आत्महत्येची खबर मिळताच पोलीस तेथे पोहोचले. चैत्रालीच्या आईला आणि अन्य नातेवाईक मंडळींना खबर देण्यात आली.

पोलिसांचे कौतुक – पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून संजय उर्फ संदेश धोंडू मेस्त्री याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध चैत्रालीची आई लता अनंत गांडले हिने खुनाची फिर्याद नोंदविल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादविक ३०२, ३६६, ३२४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवत त्याला संशयित म्हणून अटक केली असून मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. दरम्यान, शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह पती निलेश मेस्त्री याच्या ताब्यात देण्यात आला. या मृत्यूचे गुढ पोलिसांनी अवघ्या २४ तासात उघड केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular