जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीच्या सहाव्या टप्प्यात सुमारे १ हजार शिक्षकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील संवर्ग १ व २ मधील सुमारे २३४ जणांच्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली. येत्या दोन दिवसांत बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली जाणार आहे; मात्र त्यांना नवनियुक्ती शिक्षक आल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. सध्या प्रक्रिया पूर्ण करून ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. गतवर्षी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया पाच टप्प्यात घेण्यात आली. त्यामध्ये सुमारे साडेसातशेहून अधिक शिक्षक परजिल्ह्यातील शाळांमध्ये रूजू झाले.
त्याला ठाकरे सेनेसह विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध झाला होता; परंतु नवीन भरतीसाठी रिक्त पदे निश्चित होणे आवश्यक असल्याचे कारण पुढे करत आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या २ हजारावर पोचली आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची वानवा झाली होती. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शासनाने कंत्राटी तत्त्वावर नऊ हजार रुपये मानधनावर काही शिक्षकांची नियुक्ती केली आहे.
त्यामुळे नियमित कारभार सुरू असला तरीही गुणवत्तेत भर पडणे अशक्य आहे. ही परिस्थिती असतानाच शासनाने सहाव्या टप्प्यात उर्वरित शिक्षकांसाठी बदली पोर्टल सुरू केले होते. त्यामध्ये सुमारे १ हजार शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यातील संवर्ग १ मधील माजी सैनिक, आजारी, विधवा, परित्यक्ता आणि संवर्ग २ मधील पती-पत्नी एकत्रिकरणाचे २३४ जणांची कागदपत्रे पडताळणी बुधवारी (ता. २०) जिल्हा परिषदेत झाली.
शासनाकडून आलेल्या वेळापत्रकानुसार सर्वसाधारणसह उर्वरित दोन संवर्गातील बदल्यांच्या याद्या दोन दिवसांत जाहीर होणार आहेत. त्यामध्ये किती शिक्षक परजिल्ह्यात जाणार, हे निश्चित होईल. जिल्हा परिषदेच्या पावणेतीन हजार शाळांमध्ये ६ हजार ९०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी २ हजार पदे रिक्त आहेत. नव्याने एक हजार शिक्षक परजिल्ह्यात गेले, तर रिक्त पदांची संख्या वाढणार आहे. सुदैवाने, ही प्रक्रिया पूर्ण होणार असली तरीही बदली झालेल्यांना नवीन शिक्षक येईपर्यंत जिल्ह्यातच राहावे लागणार आहे.